Join us

Tilak Varma ला 'रिटायर्ड आऊट' का केलं? Hardik Pandya म्हणाला- "त्यावेळी आम्हाला..."

Hardik Pandya on Tilak Varma Retired Out, Mumbai Indians, IPL 2025 MI vs LSG: हार्दिक पांड्याने सामन्यानंतर तिलक वर्माच्या रिटायर्ड आऊट निर्णयावरही उत्तर दिले.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2025 10:20 IST

Open in App

Hardik Pandya on Tilak Varma Retired Out, Mumbai Indians, IPL 2025 MI vs LSG: लखनौ सुपर जायंट्स (Lucknow Super Giants) संघाने शेवटच्या षटकात मुंबई इंडियन्सचा रोमहर्षक पद्धतीने पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना मिचेल मार्श आणि एडन मार्करमच्या अर्धशतकांच्या जोरावर लखनौने २०३ धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईला केवळ १९१ धावाच करता आल्या. या सामन्यात एक विचित्र गोष्ट दिसली. प्रतिभावान डावखुरा फलंदाज तिलक वर्मा फलंदाजी करत असताना, मोक्याच्या क्षणी मैदानाबाहेर गेला. त्याला रिटायर्ड आऊट करण्यात आले. त्यानंतरही मुंबईला सामना जिंकता आला नाही. हार्दिक पांड्याने सामन्यानंतर विविध मुद्द्यांवर भाष्य केले. त्यातच त्याने तिलक वर्माच्या रिटायर्ड आऊट निर्णयावरही उत्तर दिले.

तिलक वर्माला बाहेर का पाठवले?

"तिलक वर्मा बराच काळ मैदानावर खेळत होता. त्याने वेगाने धावा करायचा प्रयत्नही केला. पण शेवटच्या टप्प्यात आम्हाला मोठ्या फटक्यांची गरज होती. पण दुर्दैवाने तिलक वर्माला तसे फटके मारता येत नव्हते. कालचा दिवस त्याचा नव्हता. त्यामुळे त्याच्याबद्दल अशाप्रकारचा निर्णय घ्यावा लागला. आम्हाला कायमच सामना जिंकायचा असतो त्यामुळे असे निर्णय घ्यावे लागतात," असे उत्तर हार्दिक पांड्याने दिले.

पराभवाचे खापर कुणावर फोडले?

"कुठलाही सामना हरल्यानंतर त्याबद्दल वाईट वाटणे स्वाभाविक असते. आम्ही गोलंदाजीत खूप जास्त धावा दिल्या. मी गोलंदाजी करताना मला चांगले वाटले. पण आमच्याकडे फारसे पर्याय नव्हते. पण मी पिचचा अंदाज घेत गोलंदाजी केली आणि त्यामुळेच मला विकेट्स मिळाल्या. मी आक्रमक गोलंदाजी करत होतो. निर्धाव चेंडू टाकणे हा माझा विचार होता, जेणेकरून फलंदाज चुका करतील आणि बाद होतील. पराभवाचे खापर कुणा एकावर फोडणार नाही. कारण विजय किंवा पराजय हा सांघिक प्रकार आहे," असेही हार्दिक म्हणाला.

स्पर्धा खूप मोठी...

"आम्हाला चांगले क्रिकेट खेळायचे आहे. त्यासाठी आम्हाला योग्यप्रकारे गोष्टी कराव्या लागतील. गोलंदाजीत आम्हाला अधिक स्मार्टली काम करावे लागेल. वेळप्रसंगी थोडे जास्त आक्रमक व्हावे लागेल. सध्या संघात या गोष्टीची उणीव आहे. ही स्पर्धा खूप मोठी आहे. पुढील एक-दोन सामन्यात विजय मिळवून आम्ही नक्कीच कमबॅक करू," असा हार्दिक पांड्याने विश्वास व्यक्त केला.

 

टॅग्स :इंडियन प्रिमियर लीग २०२५हार्दिक पांड्यातिलक वर्मामुंबई इंडियन्स