Gujarat Titans vs Punjab Kings, 5th Match : अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगलेल्या सामन्यात श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील पंजाब किंग्ज संघानं घरच्या मैदानात खेळणाऱ्या शुबमन गिलच्या नेतृत्वाखालील गुजरात टायटन्स संघाला पराभूत केले आहे. या विजयासह पंजाब किंग्जच्या संघानं यंदाच्या हंगामात दमदार सुरुवात करत आपल्या खात्यात २ गुण जमा केले आहेत. अखेरच्या षटकात पंजाबच्या संघाकडून इम्पॅक्ट प्लेयरच्या रुपात आलेल्या विजयकुमार वैशक याने अचूक टप्प्यावर गोलंदाजी करत गुजरातच्या संघाच्या अडचणी वाढवल्या. त्याने टिच्चून केलेली गोलंदाजी गुजरातच्या संघाला बॅकफूटवर ढकलणारी ठरली.
लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
साई सुदर्शनसह बटलरचं अर्धशतक, पण
पंजाबच्या संघानं दिलेल्या धावांचा पाठलाग करताना गुजरात टायटन्स संघाकडून कर्णधार शुबमन गिल आणि साई सुदर्शन जोडीनं संघाच्या डावाची सुरुवात केली. या दोघांनी पॉवर प्लेमध्ये चांगली फटकेबाजी करत संघाला चांगली सुरुवात करून दिली. पण सहाव्या षटकातील पाचव्या चेंडूवर बॅटिंगमध्ये झिरो ठरलेल्या ग्लेन मॅक्सवेलनं शुबमन गिलच्या रुपात गुजरातच्या संघाला पहिला धक्का दिला. शुबमन गिलनं १४ चेंडूत ३३ धावांची खेळी करुन माघारी फिरला. कर्णधार तंबूत परतल्यावर साई सुदर्शननं ४१ चेंडूत ५ चौकार आणि ६ षटकाराच्या मदतीने ७४ धावा करत संघाच्या आशा पल्लवित ठेवल्या. पण अर्शदीप सिंगनं त्याची विकेट घेत संघाला मोठा दिलासा दिला. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना जोस बटलरनं ३३ चेंडूत ४ चौकार आणि ३ षटकाराच्या मदतीने ५४ धावांची खेळी केली. मार्को यान्सेन याने त्याला बोल्ड केले. त्याची विकेट पडल्यावर गुजरातच्या संघाच टेन्शन वाढलं. अखेरच्या षटकात विजयकुमार वैशक याने सुरुवातीला तुफान फटकेबाजी करणाऱ्या शेरफेन रुदरफोर्डच्या फटकेबाजीचा वेग कमी केला अन् सामना पंजाबच्या बाजूनं फिरला.
पंजाबकडून श्रेयस अय्यरसह शशांक अन् प्रियांशचा जलवा
पंजाब किंग्जच्या संघानं पहिल्यांदा फलंदाजी करताना कर्णधार श्रेयस अय्यरच्या ४२ चेंडूतील नाबाद ९७ धावा आणि अखेरच्या षटकात शशांक सिंग याने केलेली १६ चेंडूतील ४४ धावांची तुफान फटकेबाजीच्या जोरावर धावफलकावर निर्धारित २० षटकात २४३ धावा लावल्या होत्या. या दोघांशिवाय पंजाबच्या ताफ्यातील युवा सलामीवीर प्रियांश आर्यानं पदार्पणातील सामन्यात २३ चेंडूत ४७ धावांचे योगदान दिले.