देशांतर्गत क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी करून लक्षवेधून घेणाऱ्या ३३ वर्षीय करुण नायरनं १०७७ दिवसांनी आयपीएलमध्ये जबरदस्त कमबॅक केले. २०२२ च्या हंगामात राजस्थान रॉयल्सकडून कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध शेवटचा सामना खेळणाऱ्या नायरला दिल्ली कॅपिटल्सच्या संघानं मुंबई इंडियन्स विरुद्धच्या सामन्यात इम्पॅक्ट प्लेयरच्या रुपात मैदानात उतरवले. त्याने २२ चेंडूत अर्धशतक झळकावत संघाचा निर्णय सार्थ ठरवला.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
आयपीएलमध्ये ७ वर्षांनी त्याच्या भात्यातून आली फिफ्टी
यंदाच्या हंगामात दिल्ली कॅपिटल्सच्या ताफ्यात सामील होण्याआधी पंजाब, कोलकाता आणि राजस्थानच्या संघाकडून करुण नायर आयपीएलमध्ये खेळताना दिसला होता. नायरने आयपीएलमधील अखेरचे अर्धशतक २०१८ मध्ये किंग्ज इलेव्हन पंजाबकडून खेळताना दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाविरुद्ध झळकावले होते. आता दिल्ली फ्रँचायझी संघाकडून खेळताना त्याने मुंबई इंडियन्स विरुद्ध दमदार इनिंग खेळली. त्याने आपल्या कमबॅक सामन्यात ट्रेंट बोल्डसह बुमराहविरुद्ध आक्रमक अंदाजात फलंदाजी केली. जसप्रीत बुमराहच्या एका षटकात तर त्याने १६ धावा कुटल्याचे पाहायला मिळाले.
देशांतर्गत क्रिकेटमधील दमदार कामगिरीच्या जोरावर IPL मध्ये एन्ट्री, दिल्लीनं ५० लाख रुपयांसह घेतले ताफ्यात
देशांतर्गत क्रिकेटमध्ये करून नायर याने आपल्या फलंदाजीतील धमक दाखवली. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेत त्याने विदर्भ संघाकडून खेळथाना ६ सहा डावात १७७ च्या स्ट्राइक रेटनं २५५ धावा कुटल्या होत्या. विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत पाच डावांमध्ये ५४२ धावा आणि रणजी ट्रॉफी स्पर्धेत १६ डावांमध्ये ८६३ धावा केल्या. विदर्भच्या संघाला तिसऱ्यांदा जेतेपद पटकावून देण्यात त्याने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. या कामगिरीच्या जोरावरच दिल्ली कॅपिटल्सच्या संघानं ५० लाख रुपयांसह त्याला आपल्या ताफ्यात सामील करून घेतले. फाफ ड्युप्लेसिसच्या अनुपस्थितीत त्याला इम्पॅक्ट प्लेयरच्या रुपात यंदाच्या हंगामात त्याला पहिला सामना खेळण्याची संधी मिळाली. २०० प्लसच्या लढाईत त्याने इम्पॅक्ट टाकणारी खेळी केल्याचे पाहायला मिळाले.