IPL 2025 DC vs LSG, All Eyes On Axar Patel Captaincy इंडियन प्रीमियर लीग २०२५ (IPL 2025) स्पर्धेच्या १८ व्या हंगामातील चौथ्या दिवशी दिल्ली कॅपिटल्सचा संघ नवा कर्णधार आणि नव्या इराद्यासह विशाखापट्टणमच्या मैदानातून आपल्या मोहिमेला सुरुवात करणार आहे. दिल्ली फ्रँचायझी संघ पहिल्यापासून या स्पर्धेचा भाग आहे. पण अद्याप त्यांना एकदाही ही स्पर्धा गाजवता आलेली नाही. आयपीएलच्या इतिहासातील आतापर्यंतचा दुष्काळ संपवून जेतेपदासह इतिहास रचण्यासाठी दिल्लीच्या संघानं टीम इंडियातील 'बापू' अर्थात अक्षर पटेलकडे संघाचे नेतृत्व सोपवले आहे. आयपीएलमध्ये तो पहिल्यांदाच मोठी जबाबदारी सांभाळणार असल्यामुळे त्याच्या नेतृत्वासह अष्टपैलू कामगिरीकडे सगळ्यांच्या नजरा लागून असतील.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
ज्याच्या नेतृत्वाखाली खेळला त्यालाच भिडणं ही एक मोठी 'कसोटी'च
आयपीएलच्या आतापर्यंतच्या इतिहासातील दिल्ली कॅपिटल्स संघाचा तो १३ वा कर्णधार आहे. नेतृत्व सिद्ध करत असताना आतापर्यंत दिल्ली कॅपिटल्सच्या कोणत्याही कॅप्टनला जे जमलं नाही ते संघाकडून करून घेण्याचं मोठं चॅलेंज त्याच्यासमोर असेल. त्यात पहिल्यांदा कॅप्टन्सी करत असताना तो आतापर्यंत दिल्लीकडून ज्याच्या नेृत्वाखाली खेळला त्या माजी कर्णधाराशी म्हणजे रिषभ पंतला भिडणार आहे. ही त्याच्यासमोरील आणखी एक कसोटी असेल.
'बापू' म्हणजे जबाबदारी निभावण्याची 'गॅरेंटी'च; ही जमेची बाजू नेतृत्व करतानाही दिसणार
अक्षर पटेल याने भारतीय संघाकडून खेळताना आपल्या अष्टपैलूत्वाची खास छाप सोडलीये. टीम इंडियाकडून खेळताना जी भूमिका दिली ती त्याने उत्तमरित्या बजावलीये. याच क्षमतेच्या जोरावर तो आयपीएल स्पर्धेला सुरुवात होण्याआधी घरच्या मैदानात झालेल्या इंग्लंड विरुद्धच्या टी-२० मालिकेत भारतीय टी-२० संघाचा उप कर्णधार झाला. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतही त्याने लेफ्ट राइट कॉम्बिनेशनचा तिढा सोडवण्यासाठी मिळालेली बढती योग्य ठरवली. 'बापू' अर्थात अक्षर पटेल म्हणजे जबाबदारी निभावण्याची 'गॅरेंटी'च हा पॅटर्न त्याच्या बाबतीत सेट झाला. नेतृत्वातही तीच झलक पाहायला मिळणार का? ते पाहण्याजोगे असेल.
कॅप्टन्सीच्या दबावात अष्टपैलूत्वाचा तोरा टिकवण्याचे चॅलेंज
कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळत असताना भल्या भल्या स्टार क्रिकेटर्संच्या वैयक्तिक कामगिरीत घसरण झाल्याची अनेक उदाहरणे आहेत. खांद्यावरील नेतृत्वाच्या ओझ्यामुळे त्याच्या फलंदाजी आणि गोलंदाजीवर त्याचा परिणाम होणार का? यावरही सर्वांच्या नजरा असतील. अनुभवी फाफ ड्युप्लेसिस उप कर्णधारच्या रुपात त्याच्यासोबत आहे. टेन्शन फ्री राहण्यासाठी त्याला या अनुभवी खेळाडू कशी साथ देणार तेही पाहण्याजोगे असेल.
कशी आहे अक्षर पटेलची आयपीएलमधील कामगिरी?
अक्षर पटेल याने २०१३ मध्ये मुंबई इंडियन्सच्या ताफ्यातून आयपीएलमध्ये पदार्पण केले. पण या हंगामात त्याला संधीच मिळाली नव्हती. २०१४ च्या हंगामात पंजाब फ्रँचायझीकडून तो मैदानात उतरला. १७ सामन्यात १७ विकेट्स आणि ६२ धावा अशी कामगिरी करून तो चर्चेत आला. २०१६ च्या हंगामात त्याने हॅट्रिकचा डावही साधला आहे. २०१९ पासून तो दिल्ली कॅपिटल्सच्या ताफ्यातून खेळतोय. आतापर्यंत त्याने १५० सामन्यात १२३ विकेट्स आपल्या खात्यात जमा केल्या आहेत. फलंदाजीमध्ये १५० सामन्यात त्याच्या खात्यात ३ अर्धशतकांसह १६५३ धावा जमा आहेत.
Web Title: IPL 2025 DC vs LSG 4th Match Lokmat Player to Watch Axar Patel Delhi Capitals Leadership Roles
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.