नियमित कर्णधार हार्दिक पांड्याच्या अनुपस्थिती मुंबई इंडियन्सच्या संघानं सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली आयपीएलच्या यंदाच्या हंगामाची सुरुवात केली. पण चेन्नई सुपर किंग्जच्या घरच्या मैदानात खेळताना त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. आयपीएल हंगामातील सलामीच्या सामन्यात पराभूत होण्याची मुंबई इंडियन्स संघाची ही काही पहिली वेळ नाही.
सलग १३ व्या वेळी मुंबई इंडियन्सवर सलामीच्या लढतीत पराभवाची नामुष्की
सलग १३ व्या हंगामात त्यांच्यावर ही नामुष्की ओढावली आहे. याआधी २०१२ च्या हंगामात त्यांनी चेन्नई सुपर किंग्जला सलामीच्या लढतीत पराभूत करून विजयी सलामी दिली होती. त्यानंतर प्रत्येक हंगामात मुंबई इंडियन्सला पहिल्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे.
मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांवर कुणामुळं आली 'पहिली मॅच देवाला' असं म्हणायची वेळ?
मुंबई इंडियन्सचे कट्टर चाहते आपल्या संघाचा बचाव करताना 'पहिली मॅच देवाला' असा रिप्लाय देतात. ही गोष्ट अनेकदा पाहायला मिळाली आहे. पण पुन्हा मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांवर 'पहिली मॅच देवाला चाहते' म्हणायची वेळ कुणामुळं आली? इथं जाणून घेऊयात त्या खेळाडूंविषयी जे चेन्नई सुपर किंग्ज विरुद्धच्या लढतीत संघाच्या पराभवाला कारणीभूत ठरले.
ट्रेंट बोल्ड
जसप्रीत बुमराहच्या अनुपस्थितीत मुंबई इंडियन्सच्या संघाच्या गोलंदाजीची धूरा न्यूझीलंडचा स्टार जलदगती गोलंदाज ट्रेंट बोल्ट याच्या खांद्यावर होती. ट्रेंट बोल्ट हा पहिल्या षटकात विकेट घेऊन संघाला चांगली सुरुवात करुन देण्यासाठी ओळखला जातो. पण चेन्नई सुपर किंग्ज विरुद्धच्या लढतीत त्याला हा तोरा दाखवता आला नाही. अल्प धावसंख्येचा बचाव करताना त्याच्याकडून भेदक माऱ्याची अपेक्षा होती. पण त्याने ३ षटकात २७ धाव खर्च करताना एकही विकेट घेतली नाही. त्यामुळे चेन्नईचा विजयाचा मार्ग आणखी सोपा झाला.
कार्यवाहू कॅप्टन सूर्यकुमार यादवचा कॅप्टन्सीसह फलंदाजीतील फ्लॉप शो
हार्दिक पांड्याच्या अनुपस्थितीत भारतीय टी-२- संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवनं मुंबई इंडियन्स संघाचे नेतृत्व केले. आयपीएलमध्ये तो दुसऱ्यांदा या फ्रँचायझी संघाचे नेतृत्व करत होता. पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना त्याने संघाला विजयही मिळवून दिला होता. हा रेकॉर्ड तो तसाच कायम ठेवेल, अशी अपेक्षा होती. पण तो कॅप्टन्सीसह फलंदाजीतही फ्लॉप ठरला. आघाडीच्या विकेट्स लवकर पडल्यावर सूर्यकुमार यादववर मैदानात तग धरून संघाचा डाव सावरण्याची जबाबदारी होती. तो सेट झाला की, एकहाती सामना फिरवण्याची क्षमता त्याच्यात आहे. पण धोनीच्या चपळाईसमोर तो फिका पडला. त्याने मोक्याच्या क्षणी यष्टिचितच्या स्वरुपात आपली विकेट गमावली अन् मुंबई इंडियन्सच्या संघाच्या अडचणी वाढल्या.
रोहित शर्माचा फ्लॉप शो
यंदाच्या हंगामात इशान किशन हा मुंबई इंडियन्सच्या ताफ्याचा भाग नाही. तो हैदराबादच्या ताफ्यात गेला अन् तिथं त्यानं जलवाही दाखवला. दुसरीकडे त्याच्या अनुपस्थितीत नव्या सवंगड्यासोबत संघाला दमदार सुरुवात करुन देण्याची मोठी जबाबदारी रोहित शर्माच्या खांद्यावर होती. पण रोहितनं पहिल्याच षटकात विकेट फेकली, त्याला खातेही उघडता आले नाही. त्याची विकेट पडल्यावर चेन्नईच्या गोलंदाजांना आणखी बळ मिळाले. परिणामी ठराविक अंतराने मुंबई इंडियन्सच्या संघाने आघाडीच्या विकेट्स गमावल्या.