मुंबई इंडियन्सचा संघ आयपीएल स्पर्धेच्या १८ व्या हंगामाच्या आपल्या मोहिमेची सुरुवात ही चेन्नई सुपर किंग्जच्या मैदानातून करणार आहे. दोन्ही संघांनी प्रत्येकी ५-५ वेळा या स्पर्धेचे जेतेपद पटकावलंय. एवढेच नाही तर जगातील प्रसिद्ध टी-२० लीगमधील लोकप्रियतेच्या बाबतीतही हेच दोन संघ आघा़डीवर आहेत. चेन्नईच्या बालेकिल्ल्यात पाऊल ठेवताच येलो जर्सीच्या गर्दीत रोहित शर्माची क्रेझ पाहायला मिळालीये. रोहित शर्माचा चेन्नईच्या मैदानातील धोनीच्या नावाचा टी-शर्ट घालून मिरवणाऱ्या फॅनच्या येलो जर्सीवर ऑटोग्राफ करतानाचा व्हिडिओ चांगलाच चर्चेत आला. या व्हिडिओतूनच मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज यांच्यातील लढतीत रोहित शर्माही लक्षवेधी ठरणार याचे संकेत मिळाले. यामागे काही खास कारण आहेत. त्यासंदर्भातील सविस्तर माहिती आपण जाणून घेऊयात.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
दोन ICC ट्रॉफी विजेत्या टीम इंडियाचा कॅप्टन
चेन्नईच्या मैदानात मुंबईकर रोहित शर्माची क्रेझ दिसण्यामागची जी काही खास कारणं आहेत त्यातील सध्याच्या घडीला सर्वोत मोठं कारण हे की, रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडियानं टी-२० वर्ल्ड कप पाठोपाठ चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा जिंकून दाखवलीये. आयसीसी स्पर्धेत भारतीय संघाचा यशस्वी कर्णधार ठरत असल्यामुळे धोनीच्या बालेकिल्ल्यात जमलेल्या येलो जर्सीतील क्रिकेट चाहताही अगदी सहज रोहित शर्माकडे आकर्षित होईल. सामना चेन्नई सुपर किंग्जच्या मैदानात असला तरी इथं हिटमॅनची क्रेझ पाहायला मिळेल.
रोहित शर्माचा चेन्नई सुपर किंग्स विरुद्धचा झक्कास रेकॉर्ड
रोहित शर्माचा चेन्नई सुपर किंग्ज विरुद्धचा रेकॉर्ड एकदम झक्कास आहे. ३३ सामन्यातील ३३ डावात त्याने या फ्रँचायझी संघाविरुद्ध ७९१ धावा केल्या आहेत. चेन्नई विरुद्ध सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो तिसऱ्या क्रमांकावर आहे. CSK विरुद्ध सर्वाधिक अर्धशतके झळकवण्याच्याय बाबतीतही तो ७ अर्धशतकासह दुसऱ्या स्थानावर आहे. चेन्नई विरुद्ध खेळताना रोहितच्या भात्यातून ७२ चौकार आणि २७ षटकारही आले आहेत. त्याचा हा रेकॉर्ड आणि सध्याचा फॉर्म त्याला लक्षवेधी खेळाडू ठरवण्यास पुरेसा ठरतो.
बऱ्याच वर्षांनी पुन्हा या फ्रँचायझी विरुद्ध बेस्ट कामगिरीची आस
रोहित शर्माचा चेन्नई सुपर किंग्स विरुद्धचा रेकॉर्ड उत्तम आहे. पण या संघाविरुद्ध त्याची सर्वोत्तम खेळीही २०११ च्या हंगामात मुंबईतील वानखेडेच्या मैदानात आली होती. चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करताना त्याने ४८ चेंडूत ८७ धावांची खेळी केली होती. ही त्याची चेन्नई सुपर किंग्स विरुद्धची अविस्मरणीय खेळी आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील फायनलमध्ये दमदार खेळी केल्यावर तो चेपॉकच्या मैदानात उतरणार आहे. त्यामुळे यावेळी डावाची सुरुवात करताना तो आणखी एक अविसरणीय खेळी करेल, अशी आशाही रोहित शर्माच्या चाहत्यांना असेल.