Jasprit Bumrah Fitness Update, IPL 2025: टीम इंडियाचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील शेवटच्या सामन्यात बुमराहला दुखापत झाली होती. त्यानंतर त्याला विश्रांती घेण्याचा सल्ला देण्यात आला होता. आता तो आयपीएलमध्ये खेळताना दिसेल असे मानले जात आहे. अलिकडेच तो सराव करतानाही दिसला होता. पण बुमराहच्या तंदुरुस्तीबाबत एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. ही बातमी मुंबई इंडियन्ससाठी मोठा धक्का मानला जात आहे.
जसप्रीत बुमराहबद्दल महत्त्वाची अपडेट
टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, जसप्रीत बुमराह आयपीएल २०२५च्या सुरुवातीच्या सामन्यांमध्ये खेळताना दिसणार नाही. बुमराह सध्या बेंगळुरूमधील BCCI सेंटर ऑफ एक्सलन्स येथे पुनर्वसन प्रक्रियेतून जात आहे. पण तो आयपीएल २०२५ च्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात खेळू शकणार नाही. याचा अर्थ तो अजूनही गोलंदाजी करण्यासाठी पूर्णपणे तंदुरुस्त नाही. बुमराह एप्रिल महिन्यातच मुंबई इंडियन्सच्या संघात सामील होण्याची शक्यता आहे.
बीसीसीआयच्या एका सूत्राने सांगितले की, बुमराचा वैद्यकीय अहवाल ठीक आहे. त्याने सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये गोलंदाजी सुरू केली आहे. तरीही आयपीएलच्या सुरुवातीला काळात तो गोलंदाजी करू शकेल याची शक्यता कमीच आहे. सध्याच्या परिस्थितीनुसार, एप्रिलचा पहिला आठवडा त्याच्या परतीसाठी सर्वोत्तम वेळ असल्याचे दिसते. वैद्यकीय पथक हळूहळू त्याच्या कामाचा भार वाढवेल. जर तो काही दिवस कोणत्याही अस्वस्थतेशिवाय पूर्णपणे वेगाने गोलंदाजी करू शकला नाही तर त्याला वैद्यकीय पथकाकडून परवानगी मिळण्याची शक्यता कमीच आहे.
बुमराह किती सामने मुकेल?
जर बुमराह एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात परतला तर तो मुंबई इंडियन्सच्या पहिल्या ३ ते ४ सामन्यांना मुकण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, लखनौ सुपर जायंट्सचा वेगवान गोलंदाज मयंक यादव देखील हंगामाच्या सुरुवातीला संघात सामील होऊ शकणार नाही. रिपोर्टनुसार, मयंक यादव देखील एप्रिलमध्ये आयपीएलमध्ये सामील होण्याची अपेक्षा आहे.