BCCI Rule Change, IPL 2025: भारताच्या श्रीमंत टी२० लीग स्पर्धेला २२ मार्चपासून सुरुवात होत आहे. २२ मार्चला कोलकाता आणि बंगळुरू या दोन संघांच्या सामन्याने स्पर्धेची सुरूवात होणार आहे. या स्पर्धेची सुरुवात होण्याआधी बीसीसीआयने एक महत्त्वाच्या नियमात बदल केला आहे. IPL मधील Mumbai Indians सह सर्व १० संघांच्या कर्णधारांची मुंबईत बीसीसीआय मुख्यालयात आज बैठक झाली. या बैठकीत बीसीसीआयने एका नियमाबाबत प्रस्ताव ठेवला आणि यावर अंतिम निर्णय घेण्यात आला. सहसा कर्णधारांची बैठक पहिला सामना ज्या ठिकाणी असतो, तेथे होते. पण यंदा ही बैठक बीसीसीआय कार्यालयात घेतली गेली. त्यामुळे एखादी महत्त्वाची घोषणा होणार याची कल्पना होतीच. त्यानुसार, बीसीसीआयने एक महत्त्वाचा नियम बदलला.
BCCI ने केला नियमात बदल
सर्व कर्णधारांची बैठक आज मुंबईतील बीसीसीआय मुख्यालयात झाली. आयपीएल संघांच्या कर्णधारांव्यतिरिक्त, फ्रँचायझींचे व्यवस्थापक देखील या बैठकीला उपस्थित होते. यंदाच्या हंगामापासून चेंडूची चकाकी कायम ठेवण्यासाठी थुंकी किंवा लाळ लावण्यावरील बंदी उठण्याचा प्रस्ताव सर्व कर्णधारांपुढे ठेवण्यात आला. बोर्डाच्या या प्रस्तावावर बहुतांश कर्णधारांनी होकार दिला. काहींनी आपला निर्णय राखून ठेवला, पण बहुमताने चेंडूला लाळ किंवा थुंकी लावण्यावरील बंदी उठवण्याचा निर्णय घेण्यात आला.
चेंडूवर लाळ, थुंकी वापरण्यावर बंदी का होती?
आयसीसीने कोरोना काळात खबरदारीचा उपाय म्हणून चेंडूला चकाकी आणण्यासाठी वापरात येणाऱ्या लाळेवर बंदी घातली होती. संक्रमणातून पसरण्यात येणाऱ्या कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी हा नियम लागू करण्यात आला होता. मात्र आता कोरोनाची भीती जवळपास संपली आहे. त्यामुळे बीसीसीआयने ते 'जुने दिवस' परत आणण्याचा निर्णय घेतला आहे.