IPL 2024 Suryakumar Yadav : इंडियन प्रीमिअर लीग २०२४ मध्ये सलग तीन पराभवानंतर मुंबई इंडियन्सने अखेर विजयाची चव चाखली. सूर्यकुमार यादवने मागील सामन्यातून MI च्या ताफ्यात पुनरागमन केले, परंतु त्याचे हे पुनरागमन काही खास राहिले नाही. सूर्या भोपळ्यावर माघारी परतला. अडीच-तीन महिने सूर्यकुमार दुखापतीमुळे क्रिकेटपासून दूर होता आणि राष्ट्रीय क्रिकेट अकादमीतील पुनर्वसनाच्या काळाने त्याला भरपूर काही शिकवले.
सूर्यकुमार यादव मागच्या वर्षी दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर शेवटचा स्पर्धात्मक क्रिकेट खेळला होता. ट्वेंटी-२० मालिकेतील दुखापतीनंतर तो भारतात परतला, त्याच्या घोट्यावर शस्त्रक्रिया केली गेली. त्यानंतर तो NCA मध्ये होता. आता सूर्या परतला आहे आणि त्याने वानखेडेवर पुनरागमनाचा आपला आनंद व्यक्त केला आहे. मुंबई इंडियन्स फ्रँचायझीने सोशल मीडियावर सूर्याचा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यात सूर्याने त्याच्या दुखापतीच्या काळाचा अनुभव आणि त्यातून नेमकं काय शिकायला मिळालं हे सांगितलं आहे.
"मी वेळेवर झोपणे आणि चांगला आहार करणे यासारख्या सर्व छोट्या छोट्या गोष्टी करण्यावर लक्ष केंद्रित करण्यास सुरुवात केली. मी माझ्या आयुष्यात कधीही पुस्तक वाचले नव्हते आणि मी तेच करायला सुरुवात केली. सकाळी उठणे आणि पुनर्वसन केंद्रात चांगला वेळ घालवणे व इतरांसोबत गप्पा मारणे, हे मी केले. माझे शरीर, मेंदू पुनर्वसनाशी जोडले गेले आणि यामुळे मला थोडे जलद बरे होण्यास मदत झाली. एकाच वेळी २-३ निगल्स असल्याने, मला एकावेळी एक पाऊल उचलावे लागले," असे सूर्यकुमार यादव म्हणाला.
"मला पुनरागमन कसे करायचे आहे, हे ठरवणे माझ्यासाठी खूप महत्वाचे होते. जेव्हा मी माझ्या पत्नीशी आणि NCA मधील सर्व लोकांशी बोललो तेव्हा ते म्हणाले की, ही सूर्या २.० आवृत्ती आहे. जिथे मी फिल्टवर परत आल्यानंतर थोडा वेगळा असेन,''असे सूर्या म्हणाला. तो पुढे म्हणाला, जेव्हा तुमचा संघ खेळत असतो, तेव्हा एका खोलीत बसून त्यांना खेळताना पाहणे नेहमीच अवघड असते. मी मुंबई इंडियन्सचा सामना पाहिला नाही, असे म्हणणार नाही. पण, मी अर्धीच मॅच पाहायचो, कारण मला वेळेत झोपायला जायचे असायचे. बंगळुरुत मी १०.३० ते १०.४५ पर्यंत झोपी जायचो.
''"म्हणून मी फक्त अर्धा डाव पाहायचो. पण, दुसऱ्या दिवशी हायलाइट्समध्ये संपूर्ण खेळ पाहायचो. हे अवघड होते पण ते तिथे खेळत आहेत, हे पाहून मला खूप प्रेरणा मिळाली. त्यांना खेळताना पाहून मी अधिक कठोर मेहनत घेतली आणि पुनर्प्राप्तीवर काम केले," असे सूर्याने सांगितले.