Join us

IPL 2024: सूर्यकुमार यादव तंदुरुस्त, लवकरच खेळणार

IPL 2024: मुंबईच्या फलंदाजीला लवकरच बळकटी मिळणार आहे; कारण जगातील अव्वल क्रमांकाचा टी-२० फलंदाज सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav ) याने राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत (एनसीए) तंदुरुस्ती चाचणी जवळपास उत्तीर्ण केली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2024 05:54 IST

Open in App

नवी दिल्ली - मुंबईच्या फलंदाजीला लवकरच बळकटी मिळणार आहे; कारण जगातील अव्वल क्रमांकाचा टी-२० फलंदाज सूर्यकुमार यादव याने राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत (एनसीए) तंदुरुस्ती चाचणी जवळपास उत्तीर्ण केली आहे. तो लवकरच आयपीएलमधील यंदाचा त्याचा पहिला सामना खेळणार आहे. सूर्यकुमारवर घोट्याच्या दुखापतीसाठी आणि हर्नियाची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-२० मालिकेत तो अखेरचा खेळला होता.

बीसीसीआयच्या एका वरिष्ठ सूत्राने सांगितले, ‘सूर्यकुमारने एक नियमित चाचणी वगळता इतर सर्व चाचण्या उत्तीर्ण केल्या आहेत. तो एनसीएकडून आरटीपी प्रमाणपत्र मिळविण्यास अनिवार्य आहे. गुरुवारी त्याची आणखी एक चाचणी होणार असून त्यानंतर त्याच्या पुनरागमनाबाबत स्पष्टता येईल. सूर्यकुमार सहजपणे फलंदाजी करतोय.’ तो ७ एप्रिलला दिल्लीविरुद्ध मुंबईत सामना खेळेल का याबाबत ते म्हणाले की, ‘गुरुवारच्या चाचणीनंतरच तो कधी खेळणार हे समजेल. पुढील सामन्यासाठी केवळ तीन दिवस शिल्लक आहेत. तो दीर्घकाळानंतर पुनरागमन करत असल्यामुळे बंगळुरूविरुद्ध ११ एप्रिलला होणाऱ्या सामन्यात तो खेळू शकतो.’  

सूर्यकुमार मागील चार ते पाच सत्रांत मुंबईसाठी शानदार फलंदाज ठरला आहे. या सत्रात तीन सामने गमावणाऱ्या मुंबईला सूर्यकुमारची उणीव जाणवत आहे. सूर्यकुमारच्या जागी आलेला नमन धीर आतापर्यंत लय मिळवू शकलेला नाही. त्यामुळे कर्णधार हार्दिक पांड्याला निश्चितपणे या आव्हानाचा सामना करण्यासाठी सूर्यकुमारची गरज आहे.

टॅग्स :सूर्यकुमार अशोक यादवआयपीएल २०२४मुंबई इंडियन्स