Join us

IPL 2022 Mini Auction: 'टीम इंडिया'ला रडवणाऱ्या क्रिकेटरची IPL लिलावात एन्ट्री; पडणार पैशांचा पाऊस

'या' खेळाडूला विकत घेण्यासाठी संघांमध्ये आतापासूनच चढाओढ पाहायला मिळतेय

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2022 17:32 IST

Open in App

IPL 2022 Mini Auction: इंडियन प्रीमियर लीग (IPL) च्या पुढील हंगामासाठी खेळाडूंचा लिलाव २३ डिसेंबर रोजी कोची येथे होणार असल्याचे जवळपास निश्चित आहे. सर्व फ्रँचायझींनी IPLच्या पुढील हंगामासाठी काही खेळाडू रिटेन केले आहेत तर काही खेळाडूंना करारमुक्त केले आहे. खेळाडूंना कायम ठेवण्याची किंवा सोडण्याची यादी बीसीसीआयकडे आधीच सुपूर्द करण्यात आली आहे. त्याचबरोबर नव्या खेळाडूंनीही लिलावासाठी आपली नावे देण्यास सुरुवात केली. यावेळी मिनी लिलावात अनेक नवे चेहरे दिसणार असून त्यात एका स्फोटक अष्टपैलू खेळाडूचीही एन्ट्री झाली आहे.

'हा' स्फोटक अष्टपैलू खेळाडू मिनी लिलावात

ऑस्ट्रेलियन अष्टपैलू कॅमेरून ग्रीन (Cameron Green) इंडियन प्रीमियर लीग (IPL) लिलावासाठी आपले नाव नोंदवले आहे. कॅमेरून ग्रीन म्हणतो की, तो या टी२० लीगमध्ये खेळण्यासाठी उत्सुक आहे. कारण तिथे क्रिकेटपटूला स्वत:ला सुधारण्याची चांगली संधी आणि वातावरण मिळते. "मी लिलावासाठी नाव दिले आहे. ही एक रोमांचक संधी असेल. बरेच खेळाडू, विशेषत: वेस्टर्न ऑस्ट्रेलियाचे खेळाडू, त्यांच्या आयपीएल अनुभवाबद्दल खूप चांगले बोलतात. ते फ्रँचायजींच्या प्रतिभावान प्रशिक्षक आणि संघासोबत राहणाऱ्या अव्वल खेळाडूंबद्दल बोलतात. ते सर्व जगात त्यांच्या कौशल्यांमध्ये सर्वोत्तम आहेत. अशा वातावरणात मी अजून खेळलो नाही. मला अधिकाधिक शिकायचे आहे आणि कदाचित मला तिथे शिकण्यासाठी खूप चांगले वातावरण मिळेल," असे कॅमेरून ग्रीन म्हणाला.

अलीकडच्या काळात आपल्या पॉवर हिटिंगने अनेकांना प्रभावित करणारा ग्रीन हा IPL लिलावात महागड्या खेळाडूंपैकी एक असेल. काही महिन्यांपूर्वी भारतात झालेल्या टी२० मालिकेदरम्यान त्याला सलामीची संधी देण्यात आली होती. त्या संधीच्या वेळी तो चांगलाच यशस्वी ठरला होता. कॅमेरून ग्रीनने टीम इंडियाविरुद्ध ३ पैकी २ सामन्यात अर्धशतक झळकावले होते.

टॅग्स :आयपीएल २०२२आॅस्ट्रेलियाआयपीएल लिलावभारतीय क्रिकेट संघ
Open in App