IPL 2023, Mumbai Indians vs Punjab Kings Live Marathi : मुंबई इंडियन्से घरच्या मैदानावर लाजीरवाणा पराभव पत्करावा लागला. रोहित शर्मा व कॅमेरून ग्रीन यांच्या भागीदारीनंतर ग्रीन व सूर्यकुमार यादव यांनी पंजाब किंग्सच्या गोलंदाजांना चोपले. ग्रीन व सूर्याने वैयक्तिक अर्धशतक झळकावताना MIला विजयाच्या उंबरठ्यावर आणून ठेवले. ग्रीन व सूर्या अखेरच्या षटकांत बाद झाल्याने सामन्यात थोडी रंजकता आली होती. टीम डेव्हिडने मोठमोठे फटके मारले होते, परंतु अर्शदीप सिंगने अखेरच्या षटकात भेदक मारा केला अन् दोन स्टम्प्स तोडले. मुंबईचे विजयाचे स्वप्न तिथेच भंगले.
रोहित शर्मा ठरला 'सिक्सर किंग'; नोंदवला एकाही भारतीयाला न जमलेला विक्रम, परदेशी फलंदाजाना आव्हान
प्रत्युत्तरात, इशान किशनला ( १) अर्शदीप सिंगने दुसऱ्याच षटकात माघारी पाठवून MI ला मोठा धक्का दिला. कॅमेरून ग्रीन आणि रोहित शर्मा यांनी MIची खिंड लढवताना ७६ धावांची भागीदारी केली. १२व्या षटकात लिएम लिव्हिंगस्टनला गोलंदाजीला आणले अन् त्याने रोहितची विकेट मिळवून दिली. रोहित २७ चेंडूंत ४ चौकार व ३ षटकारांसह ४४ धावांवर कॉट अँड बोल्ड झाला. ग्रीनसोबत त्याची ७६ धावांची भागीदारी संपुष्टात आली. त्यानंतर आलेल्या सूर्यकुमार यादवने लिव्हिंगस्टोनला सलग तीन चौकार खेचले. ( पाहा तो व्हिडीओ )
६ चेंडूंत १६ धावा असा सामना रोमहर्षक वळणावर आला अन् अर्शदीपकडे शेवटचे षटक टाकण्याची जबाबदारी आली. पहिल्या चेंडूवर एक धाव घेत टीम डेव्हिडने तिलक वर्माला स्ट्राईक दिली. अर्शदीपने तिसऱ्या चेंडूवर तिलकचा त्रिफळा उडवला. त्याच्या चेंडूचा वेग इतका होता की मधल्या स्टम्प्सचे दोन तुकडे झाले. आता ३ चेंडू १५ धावा असा सामना आला. नेहाल वधेराचाही स्टम्प त्याने तोडला अन् सामना पंजाबच्या पारड्यात आणला. मुंबईला ६ बाद २०१ धावा करता आल्या अन् पंजाबने १३ धावांनी सामना जिंकला.
तत्पूर्वी, चौदाव्या षटकापर्यंत मुंबई इंडियन्सने सामन्यावर पकड घेताना PBKS ला ४ बाद ११८ धावांवर समाधान मानण्यास भाग पाडले होते, परंतु अर्जुनच्या एका षटकात ३१ धावा चोपल्या अन् MIच्या हातून सामना निसटत गेला. सॅम करन ( ५५) व हरप्रीत भाटीया ( ४१) या दोघांनी मुंबईच्या गोलंदाजांना धू धू धुतले व ९२ धावांची भागीदारी केली. पंजाबने अखेरच्या ६ षटकांत १०६ धावा कुटल्या. मॅथ्यू शॉर्ट ( ११), प्रभसिमरन सिंग ( २५) व अथर्व तायडे( २९) हे माघारी परतले होते. पंजाबने ८ बाद २१४ धावांचा डोंगर उभा केला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"