IPL 2023, Mumbai Indians vs Chennai Super Kings : मुंबई इंडियन्सची गाडी आज लोकल सारखी घसरली.. रोहित शर्मा व इशान किशन यांनी जशी सुरुवात केली होती, ते पाहून आज एक्स्प्रेस मेल धावेल असे वाटले होते. पण, रोहितची विकेट पडली अन् या एक्स्प्रेसचे लोकल ट्रेनमध्ये रुपांतर झाले. त्यात चेन्नई सुपर किंग्सच्या क्षेत्ररक्षकांनीही सुरेख कामगिरी केली. ऋतुराज गायकवाड व ड्वेन प्रेटोरियसचा 'रिले' झेल चर्चेचा विषय ठरला.
रोहित (२१) व इशान ( ३२) यांनी जी सुरुवात करताना ३८ धावांची भागीदारी केली. तुषार देशपांडेने चौथ्या षटकात रोहितचा त्रिफळा उडवला. इशान किशन ( ३२ ) व सूर्यकुमार यादव ( १) यांना अनुक्रमे रवींद्र जडेजा व मिचेल सँटनर यांनी बाद केले. सूर्यकुमार यादवकडून फार अपेक्षा होत्या, परंतु सँटनरने त्याला बाद केले. कॅमेरून ग्रीनचा ( १२) अप्रतिम झेल जडेजाने स्वतःच्याच गोलंदाजीवर घेतला. अर्शद खानही ( १) सँटनरच्या गोलंदाजीवर LBW झाला. तिलक वर्मा अन् टीम डेव्हिड यांनी संयमी खेळ करताना मुंबईच्या विकेट्सचे सत्र काही काळ थांबवले. पण, जडेजाने ही जोडी तोडली. १८ चेंडूंत २२ धावा करणारा तिलक वर्मा LBW झाला.
त्रिस्तान स्टब्सला आज संधी मिळाली, परंतु सिसांडा मगालाने त्याला माघारी पाठवले. स्टब्सने सुरेख चेंडू टोलवला अन् तो टिपण्यासाठी ड्वेन प्रिटोरियस तयार होता. त्याने झेल टिपलाही, परंतु तोल जातोय लक्षात येताच त्याने पुन्हा तो हवेत फेकला अन् ऋतुराज योग्य वेळी योग्य ठिकाणी पोहोचून झेल टिपला.
टीम डेव्हिडने १७व्या षटकात ६,४,६ अशी फटकेबाजी करून मुंबईची धावसंख्या झटपट वाढवण्याचा प्रयत्न केला. पण, तुषारने अखेरच्या चेंडूवर त्याला माघारी पाठवले. डेव्हिडने मारलेला फटका अजिंक्य रहाणेने टिपला. डेव्हिड २२ चेंडूंत ३१ धावा करून माघारी परतला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"