IPL 2022 Mumbai Indians vs Royal Challengers Bangalore Live Updates : बिनबाद ५० वरून मुंबई इंडियन्सची गाडी बेक्कार घसरली आणि त्यांनी १२ धावांत ५ विकेट्स गमावल्या. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या गोलंदाजांनी कमाल करताना मुंबई इंडियन्सची अवस्था फार वाईट केली. रोहित शर्मा व इशान किशन यांनी ज्या प्रकारे सुरूवात केली होती, ती पाहून मुंबई कुणाचं ऐकत नाही असेच वाटले होते. पण, हर्षल पटेलने ( Harshal Patel) रोहितची विकेट घेतली आणि वनिंदू हसरंगासमोर( Wanindu Hasaranga) MI ची गाडी घसरण्यास सुरुवात झाली. ११ चेंडूंत त्यांचे पाच फलंदाज माघारी परतले. सूर्यकुमार यादवने ( Suryakumar Yadav) एकाकी खिंड लढवून माजी विजेत्यांची लाज राखली.
फॅफ ड्यू प्लेसिसने नाणेफेक जिंकून मुंबई इंडियन्सला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले आहे. रोहित व इशान यांनी अर्धशतकी भागीदारी केली. ७व्या षटकात हर्षल पटेलने ( Harshal Patel) चतुराईने स्वतःच्याच गोलंदाजीवर रोहितला झेल देण्यास भाग पाडले. रोहित १५ चेंडूंत ४ चौकार व १ षटकारांसह २६ धावांवर माघारी परतला. रोहितच्या विकेटनंतर मुंबई इंडियन्सच्या डावाला गळती लागली. आकाश दीपने सलामीवीर इशानला ( २६) माघारी पाठवले. वनिंदू हसरंगाने दोन विकेट्स घेताना डेवॉल्ड ब्रेव्हिस व किरॉन पोलार्ड यांना पायचीत पकडले. तिलक वर्मा घाई करण्याच्या नादात रन आऊट झाला आणि बिनबाद ५० वरून मुंबईची धावसंख्या ५ बाद ६२ अशी झाली. ग्लेन मॅक्सवेलने अप्रतिम क्षेत्ररक्षण करताना उल्लेखनीय रन आऊट केला.
त्यानंतर पटेलने आणखी एक धक्का देताना पदार्पणवीर रमणदीप सिंगला ( ६) बाद केले. सूर्यकुमार यादव एका बाजूने दमदार फटकेबाजी करताना दिसला, त्याला जयदेव उनाडकतची साथ लाभली. या दोघांनी सातव्या विकेटसाठी ३१ धावांत अर्धशतकी भागीदारी पूर्ण केले. सूर्यकुमारने ३२ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. मोहम्मद सिराजने टाकलेल्या १९व्या षटकात सूर्यकुमारने २३ धावा चोपल्या, परंतु हर्षल पटेलने २०व्या षटकात केवळ ७ धावा देऊन मुंबईला ६ बाद १५१ धावांवर समाधान मानण्यास भाग पाडले. सूर्यकुमारने ३६ चेंडूंत ५ चौकार व ६ षटकारांसह ६८ धावा चोपल्या. जयदेव १३ धावांवर नाबाद राहिला. या दोघांनी ४१ चेंडूंत ७२ धावांची भागीदारी केली.