Join us

IPL 2021, MI vs SRH: मुंबई इंडियन्सचा हैदराबादवर दणदणीत विजय, पण 'प्ले-ऑफ'चं स्वप्न भंगलं!

IPL 2021, MI vs SRH: आयपीएलमध्ये आज मुंबई इंडियन्सनं साखळी फेरीतील अखेरच्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादवर ४२ धावांनी विजय प्राप्त केला.

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2021 23:45 IST

Open in App

IPL 2021, MI vs SRH: आयपीएलमध्ये आज मुंबई इंडियन्सनं साखळी फेरीतील अखेरच्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादवर ४२ धावांनी विजय प्राप्त केला. प्ले-ऑफमध्ये धडक मारण्यासाठी मुंबई इंडियन्सनं सनरायझर्सवर १७० हून अधिक धावांनी मात करणं गरजेचं होतं. पण यात मुंबईला यश आलं नाही आणि १४ गुणांसह मुंबईला गुणतालिकेत पाचव्या स्थानावर समाधान मानावं लागलं आहे. 

मुंबई इंडियन्सनं दिलेल्या २३६ धावांच्या दमदार आव्हानाचा पाठलाग करताना सनरायझर्स हैदराबादला २० षटकांच्या अखेरीस ८ बाद १९३ धावांपर्यंतच मजल मारता आली. हैदराबादकडून कर्णधार मनिष पांडे याने ४१ चेंडूत नाबाद ६९ धावांची खेळी साकारात अखेरपर्यंत एकाकी झुंज दिली. पण त्याला अपेक्षित साथ मिळू शकली नाही. सलामीवीर जेसन रॉय (३४) आणि अभिषेक शर्मा (३३) यांनी चांगली सुरुवात केली होती. पण इतर फलंदाजांनी पुरती निराशा केली. सलामीजोडी, मनिष पांडेच्या नाबाद ६९ आणि प्रियम गर्गनं २१ चेंडूत २९ धावांचं दिलेलं योगदान वगळता इतर कोणत्याही फलंदाजाला दोन आकडी धावसंख्या देखील करता आली नाही. मोहम्मद नबी (३), अब्दुल समद(२), जेसन होल्डर (१), राशिद खान (९), वृद्धीमान साहा (२) स्वस्तात बाद झाले. मुंबई इंडियन्सकडून जसप्रित बुमराह, नेथन कुल्टरनाइल, जिमी निशम यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. तर ट्रेंट बोल्टनं एका फलंदाजाला माघारी धाडलं. 

दरम्यान, सामन्याची नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारलेल्या मुंबई इंडियन्सनं सुरुवातच धडाकेबाज अंदाजात केली होती. इशान किशननं १६ चेंडूत अर्धशतक ठोकून मनसुबे स्पष्ट केले होते. तर सूर्यकुमार यादवनंही अखेरच्या षटकापर्यंत मैदानात जम बसवून संघाला दोनशे धावांचा आकडा पार करुन दिला. इशान किशननं सामन्यात ३२ चेंडूत ८४ धावांची खेळी साकारली. यात ४ षटकार आणि ११ चौकार ठोकले. सूर्यकुमार यादवनं ४० चेंडूत ३ षटकार आणि तब्बल १३ चौकारांच्या साथीनं ८२ धावांची खणखणीत खेळी साकारली होती. इशान आणि सूर्यकुमारच्या वादळी खेळीच्या जोरावर मुंबईनं हैदराबादसमोर विजयासाठी २३६ धावांचं आव्हान उभारलं होतं. 

टॅग्स :आयपीएल २०२१मुंबई इंडियन्ससनरायझर्स हैदराबादरोहित शर्माइशान किशनसूर्यकुमार अशोक यादव
Open in App