पुणे: ‘कोरोनामुळे लोकांचे आयुष्य ढवळून निघाले. अनेकांच्या आयुष्यात साचलेपणा आणि नैराश्येची भावना निर्माण झाली. यातून आत्महत्येचे प्रकार वाढले आहेत. भारतात क्रिकेट हा खेळ देवाप्रमाणे असल्यामुळे सामान्यांच्या आयुष्यात असलेली भीती नष्ट करणे आणि त्यांच्या चेहºयावर हास्य फुलविण्यासाठी यंदा आयपीएलचे आयोजन करणे क्रमप्राप्त झाले होते,’ असे मत बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी सोमवारी व्यक्त केले.
‘कोरोनामुळे यंदा १९ सप्टेंबरपासून आयपीएलचे सत्र यूएईत आयोजित करण्याचा बीसीसीआयने निर्णय घेतला. यंदा सर्वाधिक टीव्ही प्रेक्षक लाभतील. आयपीएलचे आधीचे सर्व रेकॉर्ड मोडित निघतील. स्टेडियममध्ये प्रेक्षकांना प्रवेश नसल्यामुळे टीव्ही रेटिंग वाढणार आहे,’ असा विश्वास गांगुली यांनी सिम्बॉयसिसच्या सुवर्ण जयंती व्याख्यानमालेत बोलताना व्यक्त केला. ते म्हणाले, कोरोनामुळे लोकांच्या मनातील भय दूर करून जगण्याची आशा बळकट करण्यासाठी आयपीएल क्रिकेटचे आयोजन करणे आवश्यक होते.