मोहाली, आयपीएल 2019 : क्विंटन डी कॉक आणि रोहित शर्मा यांच्याशिवाय मुंबई इंडियन्सच्या एकाही खेळाडूला मोठी खेळी साकारता आली नाही. किंग्स इलेव्हन पंजाबच्या गोलंदाजांनी टिच्चून मारा करताना मुंबईला 20 षटकांत 176 धावांपर्यंत मजल मारून दिली. लोकल बॉय युवराज सिंगही फार करिष्मा करू शकला नाही. त्यामुळे त्याचे चाहते निराश झाले. कृणाल पांड्या व हार्दिक पांड्या यांनी अखेरच्या षटकांत फटकेबाजी करताना मुंबई इंडियन्सला समाधानकारक पल्ला गाठून दिला. हार्दिक पांड्याने 19 चेंडूंत 31 धावा चोपल्या.
रोहित शर्मा आणि क्विंटन डी कॉक यांनी कोणत्याही प्रकारचा धोका न पत्करता किंग्स इलेव्हन पंजाबच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. मुंबईने 5 षटकातं 50 धावा केल्या. त्यात रोहितच्या 32, तर डी कॉकच्या 18 धावांचा समावेश आहे. सहाव्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर हार्डस विलजोनने मुंबई इंडियन्सच्या रोहित शर्माला पायचीत केले. रोहितने 19 चेंडूंत 5 चौकारांसह 32 धावा केल्या. पहिल्या पॉवर प्लेमध्ये मुंबई इंडियन्सने 1 बाद 62 धावा झाल्या होत्या. त्यानंतर मुरुगन अश्विनने त्याच्या पहिल्याच षटकात मुंबई इंडियन्सला धक्का दिला. त्याने सूर्यकुमार यादवला पायचीत करताना किंग्स इलेव्हन पंजाबला दुसरे यश मिळवून दिले.
सातव्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर यादव ( 11) बाद झाला. क्विंटन डी कॉकने आयपीएलमध्ये 1000 धावांचा पल्ला पार केला. अवघ्या 37 डावांत त्याने ही कामगिरी केली. डी कॉक आणि
युवराज सिंग यांनी मुंबईच्या डावाला आकार देताना 10 षटकांत 2 बाद 91 धावांपर्यंत मजल मारून दिली. या दोघांनी 9 च्या सरासरीनं मुंबई इंडियन्सच्या धावांची गती कायम राखली. क्विंटन डी कॉकने 35 चेंडूंत 6 चौकार व 1 षटकार खेचताना अर्धशतक पूर्ण केले. आयपीएलमधील त्याचे हे सातवे अर्धशतक ठरले. दरम्यान मुरूगनने युवराज सिंगला धावबाद करण्याची सोपी संधी गमावली.
मोहम्मद शमीनं 13व्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर डी कॉकला पायचीत केले. डी कॉकने 39 चेंडूंत 6 चौकार व 2 षटकारांसह 60 धावा चोपल्या. त्यापाठोपाठ युवराज सिंगही माघारी परतला. लोकल बॉय युवीला मुरुगन अश्विनने बाद केले. युवीने 22 चेंडूंत 2 चौकारांसह 18 धावा केल्या. मुंबई इंडियन्सला 15 षटकांत 4 बाद 131 धावा करता आल्या. आर अश्विन आणि मुरुगन अश्विन यांनी 8 षटकातं 51 धावा देत 2 विकेट घेतल्या. किरॉन पोलार्ड व हार्दिक पांड्या यांना अखेरच्या षटकांत फटकेबाजी करण्यापासून पंजाबच्या गोलंदाजांनी रोखले.