मोहाली, आयपीएल 2019 : किंग्ल इलेव्हन पंजाबच्या ख्रिस गेलने शनिवारी मुंबई इंडियन्सविरुद्ध षटकारांचे त्रिशतक पूर्ण केले. त्याने मॅक्लेघनच्या दुसऱ्या षटकात सलग दोन षटकार खेचून आयपीएलमध्ये 300 षटकारांचा पराक्रम नावावर नोंदवला. अशी कामगिरी करणारा तो पहिलाच खेळाडू ठरला आहे. विशेष म्हणजे आयपीएलमध्ये एकाही फलंदाजाला अद्याप 200 षटकारही मारता आलेले नाही.
क्विंटन डी कॉक आणि रोहित शर्मा यांच्याशिवाय मुंबई इंडियन्सच्या एकाही खेळाडूला मोठी खेळी साकारता आली नाही. किंग्स इलेव्हन पंजाबच्या गोलंदाजांनी टिच्चून मारा करताना मुंबईला 20 षटकांत 7 बाद 176 धावांपर्यंत मजल मारू दिली. लोकल बॉय युवराज सिंगही फार करिष्मा करू शकला नाही. त्यामुळे त्याचे चाहते निराश झाले. कृणाल पांड्या व हार्दिक पांड्या यांनी अखेरच्या षटकांत फटकेबाजी करताना मुंबई इंडियन्सला समाधानकारक पल्ला गाठून दिला. हार्दिक पांड्याने 19 चेंडूंत 31 धावा चोपल्या. रोहितने 19 चेंडूंत 5 चौकारांसह 32 धावा केल्या. डी कॉकने 39 चेंडूंत 6 चौकार व 2 षटकारांसह 60 धावा चोपल्या.