Smriti Mandhana completes 10000 runs in international cricket: भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार सलामीवीर स्मृती मानधना हिने रविवारी क्रिकेट जगतात एक नवा इतिहास रचला. श्रीलंकेविरुद्धच्या चौथ्या टी२० सामन्यात धडाकेबाज फलंदाजी करत स्मृतीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १० हजार धावांचा टप्पा ओलांडला. हा टप्पा गाठणारी ती जगातील चौथी आणि भारताची दुसरी महिला क्रिकेटपटू ठरली आहे.
खास यादीत स्मृती मानधनाचे नाव
ग्रीनफिल्ड इंटरनॅशनल स्टेडियमवर रंगलेल्या या सामन्यात स्मृतीला ऐतिहासिक टप्पा आणि मैलाचा दगड गाठण्यासाठी केवळ २७ धावांची गरज होती. तिने शानदार सुरुवात करत ही धावसंख्या पूर्ण केली आणि क्रिकेटमधील दिग्गज खेळाडूंच्या पंक्तीत आपले नाव कोरले. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये केवळ मिताली राज (भारत), शार्लेट एडवर्ड्स (इंग्लंड) आणि सुझी बेट्स (न्यूझीलंड) या तिघींनाच १० हजार धावांचा टप्पा ओलांडता आला आहे. त्यापाठोपाठ आता स्मृती मानधना हिने या यादीत स्थान मिळवले आहे.
टी२० मालिकेतील पहिल्या तीन सामन्यांमध्ये स्मृतीला मोठी धावसंख्या उभारता आली नव्हती. मात्र चौथ्या सामन्यात तिने आपल्या लौकिकाला साजेसा खेळ केला. तिने आणि शेफाली वर्माने मिळून भारतीय संघाला आक्रमक सुरुवात करून दिली. या दोघींनी १०० धावांची भागीदारी रचली आणि दोघींनीही आपली अर्धशतके पूर्ण केली. स्मृतीच्या या खेळीमुळे भारताला श्रीलंकेविरुद्ध मोठी धावसंख्या उभारण्यात मदत झाली.
सर्वात जास्त धावा करणाऱ्या महिला खेळाडू
१. मिताली राज (भारत): १०,८६८ धावा
२. सुझी बेट्स (न्यूझीलंड): १०,६५२ धावा
३. शार्लोट एडवर्ड्स (इंग्लंड): १०,२७३ धावा
४. स्मृती मानधना (भारत): १०,०००+ धावा