INDW vs ENGW Test । नवी मुंबई : भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी सामना जिंकून यजमान संघाने घरच्या चाहत्यांना खुशखबर दिली. नवी मुंबईतील डिवाय पाटील स्टेडियमवर हा सामना खेळवला गेला. भारतीय महिला संघाने इंग्लंडचा ३४७ धावांनी मोठा पराभव केला. महिलांच्या कसोटीतील धावांच्या बाबतीत हा सर्वात मोठा विजय ठरला आहे. पाच दिवसीय कसोटीच्या तिसऱ्या दिवशी भारताने इंग्लंडवर मात केली. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने सामन्याच्या तीनही दिवस इंग्लिश संघावर वर्चस्व गाजवले.
भारताने नाणेफेक जिंकून पहिल्या डावात ४२८ धावा ठोकल्या. त्यानंतर इंग्लंडचा पहिला डाव १३६ धावांत आटोपला. त्यानंतर दुसऱ्या डावात ६ बाद १८६ धावा करून डाव घोषित करण्यात आला. त्यानंतर लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडचा डाव १३१ धावांवर आटोपला. भारताने इंग्लंडसमोर ४७९ धावांचे विशाल लक्ष्य ठेवले होते, ज्याचा पाठलाग करताना इंग्लिश संघ अवघ्या १३१ धावांत गारद झाला.
भारताचे वर्चस्व कायम
प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने ४२८ धावा फलकावर लावल्या. शुभा सतीशने संघाकडून सर्वाधिक ६९ धावा कुटल्या. याशिवाय जेमिमा रॉड्रिग्जने ६८, दीप्ती शर्माने ६७ आणि यास्तिका भाटियाने ६६ धावा करून पाहुण्या संघाची डोकेदुखी वाढवली. त्यानंतर पहिल्या डावात भारतीय गोलंदाजांनी इंग्लंडचा डाव केवळ १३६ धावांत गुंडाळला. भारताकडून दीप्ती शर्माने सर्वाधिक पाच बळी घेतल्या. याशिवाय स्नेहा यादवला दोन बळी घेण्यात यश आले. तर, पूजा वस्त्राकर आणि रेणुका सिंग यांना प्रत्येकी १-१ बळी मिळाला.
त्यानंतर दुसऱ्या डावात फलंदाजीला आलेल्या भारतीय संघाने ६ विकेट गमावून १८६ धावा केल्या आणि डाव घोषित केला. अशा प्रकारे भारताने इंग्लंडला ४७९ धावांचे लक्ष्य दिले. लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडचा संघ २७.३ षटकांत १३१ धावांत सर्वबाद झाला. दीप्ती शर्माने भारताकडून दुसऱ्या डावात देखील चमक दाखवत ४ बळी घेतले. याशिवाय पूजा वस्त्राकरला तीन बळी मिळाले. याशिवाय राजेश्वरी गायकवाडने (२) आणि रेणुका ठाकूरने (१) बळी घेऊन भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केला.