दुबई :भारतीय संघाने अपराजित मालिका कायम राखताना रविवारी अंतिम सामन्यात कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा पाच गड्यांनी पराभव केला आणि विक्रमी नवव्यांदा आशिया चषक पटकावला. या स्पर्धेच्या टी-२० प्रकारात भारताचे हे दुसरे विजेतेपद ठरले. पाकिस्तानला १९.१ षटकांत १४६ धावांत गुंडाळल्यानंतर भारताने १९.४ षटकांत ५ बाद १५० धावा केल्या. कुलदीप यादवची 'फिरकी' आणि तिलक वर्माचे नाबाद अर्धशतक भारताच्या विजेतेपद मोलाचे ठरले.
विशेष म्हणजे, यंदाच्या टी-२० आशिया चषक स्पर्धेत भारताने पाकिस्तानला साखळी फेरी, सुपर फोर आणि अंतिम लढत अशा तिन्ही सामन्यांत धूळ चारली. लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची चौथ्या षटकात ३ बाद २० अशी बिकट अवस्था झाली. मात्र, तिलक वर्मा आणि संजू सॅमसन यांनी चौथ्या गड्यासाठी ५० चेंडूंत ५७ धावांची भागीदारी करत भारताला विजयी मार्गावर ठेवले. तिलकने ४१ चेंडूंत अर्धशतक झळकावत भारताच्या विजयात मोलाची भूमिका निभावली. नवव्या षटकात अवरार अहमदच्या गोलंदाजीवर हुसैन तलटने संजू सॅमसनचा सोपा झेल सोडला. यावेळी, सॅमसन १२ धावांवर खेळत होता. पाकला ही चूक महागात पडली. सॅमसन बाद झाल्यानंतर शिवम दुबेने दमदार फटकेबाजी करत तिलकला चांगली साथ दिली. फहीम अश्रफने ३ बळी घेत भारतावर दडपण टाकण्याचा प्रयत्न केला.
त्याआधी, साहिबझादा फरहानच्या तडाखेबंद अर्धशतकानंतरही पाकिस्तानचा डाव मर्यादित राहिला. कुलदीप यादव याने पाकिस्तानच्या फलंदाजीला खिंडार पाडताना ४ बळी घेतले. वरुण चक्रवर्ती आणि अक्षर पटेल यांनीही प्रत्येकी २ बळी घेत कुलदीपसह पाक संघाची 'फिरकी' घेतली. जसप्रीत बुमराहनेही २ बळी घेतले. आक्रमक सुरुवात केलेल्या पाकिस्तानची एकवेळ दोनशे धावसंख्येच्या दिशेने वाटचाल सुरू होती, मात्र नंतर त्यांना दीडशे धावाही पार करता आल्या नाहीत.
अवघ्या ३३ धावांत ९ बळी गमावल्याने पाकिस्तानचा डाव १ बाद ११३ धावांवरून १४६ धावांवर संपुष्टात आला. पॉवर प्लेमध्ये बिनबाद ४५ धावा करत पाकिस्तानने चांगली सुरुवात केली. दहाव्या षटकांत चक्रवर्तीने फरहानला बाद करून ही जोडी फोडली. फरहान-फखर यानी ५८ चेंडूंत ८४ धावांची सलामी दिली. येथून भारतीय गोलंदाजांनी कमालीचे पुनरागमन केले. १५व्या षटकांत चक्रवर्तीने फखरला बाद केल्यानंतर पुढच्याच षटकात अक्षर पटेलने हुसैन धोकादायक तलतला धाडले. माघारी यानंतर, कुलदीपने १७व्या षटकांत कर्णधार सलमान आगा, शाहीन शाह आफ्रिदी आणि फहीम अश्रम यांना बाद करून पाकचे मानसिक खच्चीकरण केले.
बुमराहचे रौफला प्रत्युत्तर
हारिस रौफने गटसाखळी सामन्यात भारतीय प्रेक्षकांना डिवचताना पाक लष्कराने भारताचे कथित विमान पाडल्याचे हातवारे करून दाखवले होते. यावर भारताने आक्षेप घेतल्यानंतर रौफला सामना मानधनाच्या ३० टक्के दंड ठोठावला होता. अंतिम सामन्यात भारताच्या जसप्रीत बुमराहने १८व्या षटकांत याच रौफला त्रिफळाचित केले, चेंडू वरच्या बाजूने कसा खाली आला, हे हाताने करून दाखवले. त्याचवेळी, त्याने या हातवाऱ्यातून रौफला प्रत्युत्तरही दिले.
IND vs PAK, Asia Cup Final 2025 Match Highlights
यावेळी मात्र साधेपणाने जल्लोष
टी-२० आशिया चषक स्पर्धेतील गटसाखळी सामन्यात भारताविरुद्ध अर्धशतक झळकावून आक्षेपार्ह पद्धतीने आनंद व्यक्त करत वाद ओढवून घेतलेल्या साहिबझादा फरहानने अंतिम सामन्यात पुन्हा अर्धशतक झळकावले; परंतु यावेळी त्याने साधेपणाने अर्धशतकाचा आनंद व्यक्त केला.
हार्दिकची अनुपस्थिती
दुखापतीमुळे भारताचा स्टार अष्टपैलू हार्दिक पांड्या पाकिस्तानविरुद्धच्या या निर्णायक सामन्यात खेळू शकला नाही. मांडीचे स्नायू ताणले गेल्याने त्याला या सामन्यात खेळता आले नाही.
१ - कुलदीप यादव आंतरराष्ट्रीय टी-२० स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ४ बळी घेणारा पहिला भारतीय गोलंदाज ठरला.
२- कोणत्याही टी-२० स्पर्धेच्या अंतिम सामन्यात कुलदीप यादवने (४/३०) भारताकडून सर्वोत्तम मारा करताना इरफान पठाणची (३/१६) कामगिरी मागे टाकली.
३ - कोणत्याही टी-२० स्पर्धेत कुलदीप यादवने सर्वाधिक १७ बळी घेण्याच्या अर्शदीप सिंगच्या भारतीय विक्रमाशी बरोबरी केली. अर्शदीपने २०२४ सालच्या टी-२० विश्वचषक स्पर्धेत १७ बळी घेतले होते.
४ - टी-२० मध्ये बुमराहला ४ सर्वाधिक तीन षटकार मारणारा साहिबझादा फरहान हा पहिला फलंदाज ठरला.
५ - आंतरराष्टीय टी-२० मध्ये भारताविरुद्ध दोनवेळा ५० हून अधिक धावांची खेळी करणारा फरहान हा मोहम्मद हाफीझ आणि मोहम्मद रिझवान यांच्यानंतर पाकिस्तानचा तिसरा फलंदाज ठरला.