Join us
Daily Top 2Weekly Top 5

T20I Record : टीम इंडियानं वर्ष गाजवलं अन् पाकिस्तानच्या संघानं 'लाजवलं'

टीम इंडिया जिंकण्यात तर पाकिस्तान हारण्यात 'नंबर वन'

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2024 12:00 IST

Open in App

एका बाजूला भारतीय संघानं आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये नंबर वन कामगिरी करून दाखवनं यंदाचं वर्ष गाजवलं. दुसऱ्या बाजूला शेजारील पाकिस्तानचा संघाच्या नावे लाजिरवाण्या विक्रमाची नोंद झाली आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेतील क्लीन स्वीपनंतर पाकिस्तानचा संघ एका वर्षात सर्वाधिक आंतरराष्ट्रीय टी-२० सामने गमावणारा संघ ठरला आहे.  

पराभवाचा वचपा काढत कांगारुंनी केलं पाकच्या अब्रूच खोबरं

मोहम्मद रिझवानच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान संघाने वनडेत इतिहास रचला. पण ऑस्ट्रेलियानं टी-२० क्रिकेटमध्ये या पराभवाचा वचपा काढत पाकिस्तान संघाच्या अब्रूच खोबरं केलं. यंदाच्या वर्षात सर्वाधिक टी-२० सामने गमावण्याचा नकोसा रेकॉर्ड पाकिस्तानच्या नावे नोंदवला गेला आहे. पाकिस्तानचा संघ यंदाच्या वर्षात सर्वाधिक सामने गमावणाऱ्या संघाच्या यादीत संयुक्तरित्या दुसऱ्या क्रमांकावर आहे. नियमित सदस्यांच्या यादीत सर्वाधिक टी-२० सामने गमावणाऱ्या संघांच्या यादीत पाकिस्तानचा संघ नंबर वन आहे.

वर्षात सर्वाधिक टी२० आय सामने गमावण्याची नामुष्की

२०२४ मध्ये सर्वाधिक टी-२० सामने गमावणाऱ्या संघाच्या यादीत इंडोनेशिया अव्वलस्थानावर आहे. त्यांनी या वर्षात १५ सामने गमावले आहेत. जर पाकिस्तानला आणखी ३ सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला तर त्यांची खूप मोठी नाचक्की ओढावू शकते. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेत पाकिस्तानच्या संघाला एकही सामना जिंकता आला नाही. यासह ऑस्ट्रेलियानं पाकिस्तान विरुद्ध टी-२० मध्ये सलग ७ विजयाची नोंद केली. २०१९ ते २०२४ या कालावधीत पाकिस्तानला या संघाविरुद्ध एकही सामना जिंकता आलेला नाही. याआधी  २०२३ ते २०१४ या वर्षभरात न्यूझीलंडच्या संघाने पाकिस्तानला सलग सहा सामन्यात पराभूत करून दाखवले होते.    

२०२४ मध्ये टी-२० क्रिकेटमध्ये टीम इंडियाचा बोलाबाला

भारतीय संघानं दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यात यंदाच्या वर्षातील शेवटचा सामन्यासह मालिका जिंकून खास विक्रम नोंदवला. यंदाच्या वर्षात सर्वाधिक टी-२० सामने जिंकण्यासह सर्वच्या सर्व मालिका जिंकण्याचा पराक्रम टीम इंडियानं करून दाखवला. या वर्षात भारतीय संघाने २६ टी-२० सामने खेळले. त्यातील फक्त दोन सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला. उर्वरित २४ सामन्यात टीम इंडियाने बाजी मारली. यंदाच्या वर्षात सर्वाधिक टी-२० सामने जिंकण्याचा  विक्रम सेट करत टीम इंडियानं हे वर्ष गाजवलं. 

 

टॅग्स :भारतीय क्रिकेट संघपाकिस्तानटी-20 क्रिकेट