India's squad update for Asia Cup 2023 : आशिया चषक २०२३ स्पर्धा तोंडावर आली असताना भारतीय संघाची घोषणा झालेली नाही... वर्ल्ड कप स्पर्धा डोळ्यासमोर ठेवूनच आशिया चषक स्पर्धेसाठी वन डे संघ निवडला जाणार आहे आणि त्यामुळे बरेच प्रश्न अनुत्तरीत आहेत. चौथ्या क्रमांकाची समस्या अजून सुटलेली नाही आणि त्यानेच टीम इंडियाची डोकेदुखी वाढवलेली आहे. अशात आशिया चषक स्पर्धेसाठी निवडण्यात येणाऱ्या संघाबाबत मोठे अपडेट्स समोर येत आहेत. केरळचा फलंदाज संजू सॅमसन याला भारताच्या वन डे संघातून डच्चू मिळण्याची शक्यता बळावली आहे आणि त्यामुळे वर्ल्ड कप स्पर्धेच्या शर्यतीतूनही तो बाहेर फेकला जाणार आहे.
नुकत्याच वेस्ट इंडिजविरुद्धच्या ५ ट्वेंटी-२० सामन्यांच्या मालिकेत भारताला ३-२ असा पराभव पत्करावा लागला. यात संजू सॅमसन अपयशी ठरला. टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार यष्टिरक्षक-फलंदाज संजू सॅमसनला तीन सामन्यांत १२,७ व १३ धावा करता आल्या, तर वन डे मालिके त्याने ९ व ५१ धावा केल्या. त्यामुळेच आशिया चषक स्पर्धेसाठीच्या १५ सदस्यीय संघात त्याची निवड होण्याची शक्यता मावळली आहे. याचा अर्थ वन डे वर्ल्ड कप स्पर्धेसाठीही त्याची निवड होणे अवघड आहे.
प्रसिद्ध कृष्णाही पूर्णपणे तंदुरुस्त झालाय. २० ऑगस्ट २०२२ मध्ये तो झिम्बाब्वेविरुद्ध भारताकडून शेवटचा सामना खेळळला होता आणि तो आशिया चषक स्पर्धेत जसप्रीत बुमराहसह पुनरागमन करू शकतो. ''लोकेश राहुल पूर्णपणे तंदुरुस्त झाला आहे आणि यष्टिंमागेही चांगली कामगिरी करताना दिसतोय. श्रेयस अय्यर अद्याप पूर्णपणे तंदुरुस्त झालेला नाही. हे दोघंही बंगळुरूच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत आहेत आणि दोघांनी सराव सामन्यात सहभाग घेतला. संघाचे फिजिओ त्यांच्यावर लक्ष ठेवून आहेत,''असे सूत्रांनी सांगितले.