भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील टी-२० मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाला दारूण पराभवाला सामोरे जावे लागले. मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर शुक्रवारी (३१ ऑक्टोबर) खेळल्या गेलेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मिचेल मार्शने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या भारतीय संघाचा डाव १८.४ षटकांत केवळ १२५ धावांत गुंडाळला आणि ऑस्ट्रेलियाने हा सामना चार विकेट्स राखून जिंकला.
भारतीय फलंदाजी पूर्णपणे कोलमडल्याचे या सामन्यातून स्पष्ट झाले. संपूर्ण डावात केवळ दोनच फलंदाज दुहेरी आकडा गाठू शकले, तर आठ फलंदाज १० धावांचा टप्पा पार करू शकले नाहीत. सलामीवीर अभिषेक शर्मा याने एका टोकाला किल्ला लढवत एकट्याने धावसंख्या वाढवली. त्याने ३७ चेंडूत ८ चौकार आणि २ षटकारांसह ६८ धावांची स्फोटक खेळी केली. हे त्याचे टी-२० कारकिर्दीतील सहावे अर्धशतक ठरले. आठव्या क्रमांकावर आलेल्या वेगवान गोलंदाज हर्षित राणाने ३३ चेंडूत ३ चौकार आणि १ षटकारासह ३५ धावा केल्या. मात्र, त्याने जास्त चेंडू खेळल्यामुळे धावगती वाढवण्याचा दबाव वाढला. अभिषेक आणि हर्षित वगळता तिसऱ्या क्रमांकावर सर्वाधिक धावा अक्षर पटेलने ७ धावा केल्या
कर्णधार सूर्यकुमार यादव आणि प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी या सामन्यात फलंदाजी क्रमात काही प्रयोग केले, जे पूर्णपणे अयशस्वी ठरले. उपकर्णधार शुभमन गिल बाद झाल्यावर, संजू सॅमसनला तिसऱ्या क्रमांकावर पाठवण्यात आले. सूर्यकुमार यादव जो सहसा तिसऱ्या क्रमांकावर खेळतो. मात्र, संजू सॅमसन केवळ २ धावा करून बाद झाला आणि हा प्रयोग फसला. 
फलंदाजी क्रमातील सर्वात आश्चर्यकारक बदल म्हणजे अष्टपैलू शिवम दुबेला वेगवान गोलंदाज हर्षित राणापेक्षा खाली आठव्या क्रमांकावर पाठवणे. हर्षित (७ व्या क्रमांकावर) ने ३५ धावा केल्या असल्या तरी त्याने सर्वात जास्त चेंडू खेळले. हर्षित बाद झाल्यावर आलेल्या शिवम दुबे केवळ ४ धावा करून माघारी परतला.
या अपयशी प्रयोगांमुळे आणि प्रमुख फलंदाजांच्या निराशाजनक कामगिरीमुळे भारतीय संघाने १८.४ षटकांत केवळ १२५ धावा केल्या आणि ऑस्ट्रेलियाने ६ विकेट्स गमावून हे लक्ष्य गाठले. या पराभवाने भारतीय संघाच्या रणनीतीवर प्रश्नचिन्ह उभे केले.