कॅनबरा : जागतिक टी२० स्पर्धेच्या तयारीला अंतिम स्वरुप देण्यात व्यस्त असलेल्या भारतीय महिला क्रिकेट संघाला शुक्रवारी येथे तिरंगी मालिकेतील सलामी लढतीत बलाढ्य इंग्लंडच्या आव्हानाला सामोरे जावे लागेल. जगातील अव्वल दोन संघ इंग्लंड आणि यजमान आॅस्ट्रेलिया यांच्याविरुद्ध असलेल्या या मालिकेत भारताला आयसीसी टी२० विश्वचषकाची तयारी करण्याची उत्तम संधी मिळेल. भारतीय महिला संघाला आयसीसी स्पर्धेत पहिल्या जेतेपदाची प्रतीक्षा आहे.
भारतीय संघ २०१७ साली विश्वचषक स्पर्धेत जेतेपदाच्या समीप पोहोचला होता, पण अंतिम फेरीत त्यांना इंग्लंडविरुद्ध ९ धावांनी पराभव स्वीकारावा लागला. त्यानंतर वर्षभराने भारतीय संघ वेस्ट इंडिजमध्ये विश्व टी२० च्या उपांत्य फेरीत इंग्लंडविरुद्ध पराभूत झाला. दोन आयसीसी स्पर्धेत बाद फेरीतील भारताच्या अपयशामुळे कर्णधार हरमनप्रीत कौरने अलीकडेच म्हटले होते की, ‘दडपण झुगारण्यात भारतीय संघ अपयशी ठरला होता.’
भारताला मोठ्या स्पर्धेत जेतेपद पटकवण्यासाठी आपल्या कामगिरीव्यतिरिक्त दडपण झुगारण्याच्या क्षमतेमध्येही सुधारणा करावी लागेल. मुख्य प्रशिक्षक डब्ल्यू. व्ही. रमन यांच्या मते तिरंगी मालिकेत सहभागी झाल्यामुळे भारतीय संघाला टी२० विश्वचषकापूर्वी तयारीसाठी चांगली मदत मिळेल.
टी२० विश्वचषक स्पर्धा आॅस्ट्रेलियामध्ये २१ फेब्रुवारी ते ८ मार्च या कालावधीत रंगेल. भारताला या स्पर्धेत साखळी फेरीत यजमान आॅस्ट्रेलिया, बांगलादेश, न्यूझीलंड आणि श्रीलंका यांच्यासोबत स्थान मिळाले आहे. पश्चिम बंगालची रिचा घोष ही संघातील एकमेव नवा चेहरा आहे. महिला चॅलेंजर ट्रॉफीतील चांगल्या कामगिरीच्या आधारावर तिला संघात स्थान मिळाले आहे. हरयाणाच्या १५ वर्षीय शालेय विद्यार्थिनी शेफाली वर्माही आपल्या पहिल्या विश्वचषक स्पर्धेत सहभागी होईल. तिने पहिल्या आंतरराष्ट्रीय मोसमात काही चांगल्या खेळी करीत छाप सोडली आहे. (वृत्तसंस्था)
सामना : भारतीय वेळेनुसार सकाळी ८.४० पासून.