भारतीय संघाकडून २०१५ मध्ये ट्वेंटी-२०त पदार्पण करणाऱ्या संजू सॅमसनला ( Sanju Samson) ७ वर्षांत केवळ १६ सामने खेळण्याची संधी मिळाली. मागून आलेले रिषभ पंत, इशान किशन यांनीही सॅमसनपेक्षा अधिक ट्वेंटी-२० सामने खेळले आहेत. आता तर ऑस्ट्रेलियात होणाऱ्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी जाहीर झालेल्या संघात रिषभने पुन्हा स्थान पटकावले आहे. इशान २०२१च्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप संघाचा सदस्य होता. पण, संजूला पुन्हा डावलले गेले आणि त्यामुळे चाहते प्रचंड नाराज झाले आहेत.
BCCI ने सोमवारी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी १५ सदस्यीय व ४ राखीव खेळाडूसह भारतीय संघ जाहीर केला. मुख्य संघात नको, परंतु राखीव खेळाडूंमध्ये तरी संजू सॅमसनचे नाव अनेकांना अपेक्षित होती. पाकिस्तानचा माजी फिरकीपटू दानिश कानेरियासह अनेकांनी संजूसाठी बॅटिंग करून बीसीसीआयला जाब विचारला. फॉर्माशी झगडणाऱ्या रिषभला संधी दिल्याने चाहते अधिक खवळले. राखीव खेळाडूंमध्ये श्रेयस अय्यरच्या जागी संजूला संधी मिळायला हवी होती असेही मत अनेकांनी व्यक्त केले. त्यात आता संजू सॅमसनची पोस्ट व्हायरल झाली आहे.
संजूने त्याच्या फेसबूक पेजवर स्वतःचा फोटो पोस्ट केला. त्यात तो मोबाईल पाहतोय, यापलिकडे त्याने कोणतिच कमेंट लिहिलेली नाही. पण, नेटिझन्स त्याच्या फोटोखाली सांत्वन करताना दिसत आहेत. एकाने तर संजूला तू दुसऱ्या देशान निघून जा भारतात तुझं भविष्य अंधारमय आहे, असे लिहिले आहे...
ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारतीय संघ- रोहित शर्मा ( कर्णधार), लोकेश राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, हार्दिक पांड्या, रिषभ पंत, दिनेश कार्तिक, आर अश्विन, जसप्रीत बुमराह, युजवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अक्षर पटेल,अर्शदीप सिंग; राखीव खेळाडू - मोहम्मद शमी, श्रेयस अय्यर, रवी बिश्नोई, दीपक चहर