टी-२० वर्ल्ड कप २०२६ च्या सुपर-८ फेरीतील पहिल्याच सामन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारताचा पराभव झाला. यानंतर आता सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया पुढच्या सामन्यासाठी चेन्नईत दाखल झाली आहे. चेन्नईच्या विमानतळावर संघ उतरल्यानंतर, हार्दिक पांड्याच्या एका खास अंदाजाने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले.
हार्दिक पांड्या-माहिकाचा व्हिडिओ व्हायरल -
ANI ने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये हार्दिक पांड्या आपली गर्लफ्रेंड माहिका शर्मा हिच्या गळ्यात हात टाकून चालताना दिसून आला. हार्दिक आणि माहिकाचा हा व्हिडिओ सोशल मेडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे. त्याच्या मागे इतर खेळाडू विमानतळावरून बाहेर येताना दिसत आहेत. कर्णधार सूर्यकुमार यादव आपली पत्नी देविशा शेट्टीसोबत दिसून आला. विमानतळावरून बाहेर पडल्यानंतर सर्व खेळाडू टीम बसने हॉटेलकडे रवाना झाले.
झिम्बाब्वेविरुद्ध निर्णायक लढत -
सुपर-८ मधील भारताचा दुसरा सामना गुरुवारी, २६ फेब्रुवारी रोजी झिम्बाब्वेविरुद्ध होणार आहे. चेन्नईतील एम. ए. चिदंबरम स्टेडियमवर रंगणारा हा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७ वाजता सुरू होईल. उपांत्य फेरीच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी भारताला हा सामना जिंकणे अत्यंत आवश्यक आहे.
पहिल्या सामन्यात पत्करावा लागला पराभव
सुपर-८ च्या पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने भारताचा ७६ धावांनी पराभव केला होता. अहमदाबादमध्ये झालेल्या या सामन्यात आफ्रिकेने १८७ धावांचे आव्हान दिले होते. प्रत्युत्तरात भारतीय संघ १८.५ षटकात अवघ्या १११ धावांवर गारद झाला. शिवम दुबेने सर्वाधिक ४२ धावा केल्या, मात्र इतर कोणत्याही फलंदाजाला २० धावांचा टप्पाही ओलांडता आला नाही.