Vaibhav Suryavanshi team India: भारताचा 'छोटा पॅकेट' १४ वर्षीय फलंदाज वैभव सूर्यवंशी हा भारतीय क्रिकेटसाठी एक वरदान आहे. गेल्या वर्षभरात त्याने आपल्या फलंदाजीने तुफान प्रसिद्धी मिळवली. तो अलिकडेच ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर भारताच्या १९ वर्षांखालील संघाचा भाग होता. त्या दौऱ्यात त्याने दमदार कामगिरी करून दाखवली. सध्या तो रणजी ट्रॉफीमध्ये खेळत आहे, जिथे तो बिहार संघाचा उपकर्णधार देखील आहे. पण वैभव सूर्यवंशी लवकरच पुन्हा एकदा भारतीय संघाच्या जर्सीमध्ये दिसणार आहे. त्याच्या दृष्टीने महत्त्वाची अशी एक मोठी घोषणा नुकतीच करण्यात आली आहे.
वैभव सूर्यवंशी 'या' स्पर्धेत खेळताना दिसणार...
अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने ( ACB ) महत्त्वाची घोषणा केली आहे. त्यांच्या देशाचा अंडर-१९ क्रिकेट संघ भारत दौऱ्यावर येणार आहे. या दौऱ्यादरम्यान तिरंगी मालिका खेळवली जाईल. या मालिकेत अफगाणिस्तान अंडर-१९ संघांसह भारत अ आणि ब संघांचा समावेश असेल. याचा अर्थ असा की मालिकेत दोन भारतीय संघ सहभागी होतील. त्यामुळे यापैकी एका संघात नक्कीच वैभव सूर्यवंशी खेळताना दिसू शकतो.
डबल राऊंड-रॉबिन पद्धतीचे सामने
तिरंगी मालिकेचे स्वरूप डबल राउंड-रॉबिन असेल. यात प्रत्येक संघ चार सामने खेळेल. त्यानंतर अव्वल दोन संघांमध्ये अंतिम सामना होईल. सर्व सामने एकदिवसीय स्वरूपात खेळले जातील.
- १७ नोव्हेंबर - भारत अ विरूद्ध भारत ब
- १९ नोव्हेंबर - भारत ब विरुद्ध अफगाणिस्तान
- २१ नोव्हेंबर - भारत अ विरुद्ध अफगाणिस्तान
- २३ नोव्हेंबर - भारत अ विरुद्ध भारत ब
- २५ नोव्हेंबर - भारत ब विरुद्ध अफगाणिस्तान
- २७ नोव्हेंबर - भारत अ विरुद्ध अफगाणिस्तान
- ३० नोव्हेंबर - अंतिम सामना
१९ वर्षांखालील विश्वचषकाची तयारी
वेळापत्रक जाहीर करताना अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाचे सीईओ नसीब खान म्हणाले की, अंडर-१९ क्रिकेट विश्वचषक जवळ येत आहे आणि आम्ही गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून या स्पर्धेसाठी आमच्या संघाची तयारी करत आहोत. त्यासाठी आंतरराष्ट्रीय दौरे केले जात आहेत. संघाच्या तयारीचा भाग म्हणून आम्ही भारतात खेळणार आहोत.