ठळक मुद्देशार्दुल पालघर एक्स्प्रेस म्हणून सर्वांच्या परिचयाच्या आहेशार्दुल आज टीम इंडियाचा स्टार खेळाडू आहे
टीम इंडियाचा स्टार खेळाडू शार्दुल ठाकुर याला आज कोणत्याही परिचयाची गरज नाही. ऑस्ट्रेलियात भारतीय संघाला ऐतिहासिक विजय मिळवून देणाऱ्या शिलेदारांपैकीच एक शार्दुल होता. ऑस्ट्रेलियातून भारतात परतल्यानंतर त्याच्या फॅन्सनं त्याचं जोरदार स्वागत केलं. इतकंच काय तर सेल्फी त्याची एक झलक पाहण्यासाठीही फॅन्स आतुर झाले होते. परंतु एक किस्सा असाही आहे, तीन वर्षांपूर्वी दक्षिण आफ्रिका दौऱ्यावरून परतलेल्या शार्दुलला कोणी ओळखलंही नव्हतं.
२०१८ मध्ये शार्दुलसोबत असा प्रसंग घडला होता जेव्हा शार्दुल दक्षिण आफ्रिकेतून मुंबईत पोहोचला होता. शार्दुलनं आपल्या घरी पालघरला जाण्यासाठी मुंबईतील अंधेरी स्थानकातून ट्रेन पकडली होती. तो ज्या डब्यात प्रवास करत होता त्या डब्यात अनेक प्रवासी होते. परंतु त्यावेळी त्याला कोणीच ओळखलं नव्हतं. "दक्षिण आफ्रिकेहून परतल्यानंतर मी घरी जाण्यासाठी अंधेरीहून ट्रेन पकडली होती. मी हेडफोन्सही लावले होते आणि मला लवकर घरी पोहोचायचं होतं. जे लोकं मला ट्रेनमध्ये पाहत होते ते खरंच संभ्रमात होते की हा शार्दुल ठाकुर आहे का नाही," असं शार्दुलनंच एका मुलाखतीदरम्यान सांगितलं होतं.
"काही कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी माधा फोटो गुगलवर सर्च केला आणि त्यांना ओळख पटल्यानंतर त्यांनी मला सेल्फीसाठी विचारलं. आपण पालघरला पोहोचू आणि मग सेल्फी घेऊ असं मी त्यावेळी त्यांना सांगितलं. माझ्यासोबत ट्रेनमध्ये प्रवास करणारे अन्य प्रवासी आश्चर्यचकीत झाले होते की कोणता भारतीय खेळाडू त्यांच्यासोबत ट्रेननं प्रवास करत आहे," असंही त्यानं सांगितलं होतं. २९ वर्षीय शार्दुल आणि लोकल ट्रेनचं एक वेगळंच नातं आहे. सकाळी ५ वाजता उठून शार्दुल ट्रेननं बोरिवलीला जात असे, जेणेकरून त्याला आपल्या शाळेसाठी क्रिकेट खेळता यावं. रोज त्याचा असाच पालघर बोरिवली हा प्रवास सुरू होता. यासाठीच त्याचं नाव 'पालघर एक्स्प्रेस' असं पडलं होतं.
शार्दुल ठाकुरला ऑस्ट्रेलियाविरोधात ब्रिस्बेन येथे खेळवण्यात आलेल्या कसोटी सामन्यात खेळण्याची संधी मिळाली होती. या कसोटी सामन्यात शार्दुलनं ७ गडी बाद केले. याव्यतिरिक्त पहिल्या डावात त्यानं ६७ धावाही केल्या होत्या. पहिल्या डावात भारताचे १८६ धावांवर ६ गडी बाद झाले होते. तेव्हा शार्दुलनं वॉशिंग्टन सुंदरसह ७ व्या विकेटसाठी १२३ धावा करत भारताचं सामन्यात पुनरागमन केलं होतं.