Sandpaper' Controversy In Adelaide : अॅडिलेड येथील ओव्हलच्या मैदानात रंगलेला भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी सामना तिसऱ्या दिवशीच संपला. पण या सामन्यावेळी घडलेले किस्से अन् काही वाद याची चर्चात संपता संपेना. मोहम्मद सिराज आणि ट्रॅविस हेड यांच्यातील वाद, त्यानंतर अॅडिलेडच्या मैदानातील प्रेक्षकांनी सिराज विरोधात केलेला कल्ला, हा मुद्दाही मॅचनंतर गाजला. त्यात आता आणखी एका नव्या व्हिडिओची भर पडली आहे.
अन् सुरक्षा रक्षकांनी क्रिकेट चाहत्याला दाखवला बाहेरचा रस्ता
अॅडिलेडच्या स्टेडियममध्ये भारतीय संघाला सपोर्ट करणाऱ्या एका क्रिकेट चाहत्याला सुरक्षा रक्षकांनी धक्के मारून बाहेर काढल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणातील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय. अॅडिलेडच्या मैदानात जो प्रकार घडला त्यामागचं कारण हे संबंधित चाहत्याच्या हातात दिसलेला सँडपेपर हेच ठरले. आता अनेकांना असा प्रश्न पडेल की, त्या किरकोळ सँडपेपरममध्ये असं काय होते? जाणून घेऊयात त्यामागचीच खास स्टोरी
ऑस्ट्रेलियन क्रिकेट अन् 'सँडपेपर' हा एक कळीचा मुद्दा आहे. सँडपेपरचं थेट कनेक्शन हे २०१८ मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील कसोटी सामन्यात समोर आलेल्या चेंडूशी छेडछाड (Ball Tampering) प्रकरणाशी आहे. सँडपेपरचा वापर करूनच ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी चेंडूशी छेडछाड केल्याचा प्रकार घडला होता. या प्रकरणात स्टीव्ह स्मिथ, डेविड वॉर्न आणि कॅमरन बॅनक्रॉफ यांच्यावर बंदीची कारवाई झाली होती.
सुरक्षा रक्षक त्याला बाहेर काढत होते अन् ऑस्ट्रेलियन चाहते वाजवत होते टाळ्या
जो व्हिडिओ व्हायरल होत आहे त्यात क्रिकेट चाहता सँडपेपर हातात घेऊन स्टेडियममध्ये आल्याचे दिसते. ही चाहता नेमका कोण होता? तो कोणत्या देशाचा? हे गुलदस्त्यात आहे. पण या व्यक्तीनं भारतीय खेळाडूंच्या जर्सीप्रमाणे दिसणारी जर्सी घातली होती. हा चाहता दक्षिण आफ्रिकेचा असावा आणि भारताला सपोर्ट करताना त्याने सँडपेपर दाखवून ऑस्ट्रेलियाला डिवचण्याचा प्रकार केल्याचे एक चित्रही या व्हिडिओतून निर्माण होते. कदाचित त्याच गोष्टीमुळे सुरक्षा रक्षकांनी त्याला स्टेडियम बाहेर काढले. त्याला स्टेडियम बाहेर काढताना ऑस्ट्रेलियन चाहेत टाळ्या वाजवतानाही व्हिडिओमध्ये दिसून येते.