नवी दिल्ली - भारतीय क्रिकेटर यश दयाल याच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहेत. गाझियाबादच्या इंदिरापुरम येथे राहणारी युवती आता उघडपणे सोशल मिडियासमोर आली आहे. तिने तिच्या इन्स्टाग्राम हँडलवरून यश दयालवर गंभीर आरोप केले आहेत. त्याशिवाय या दोघांमधील खासगी चॅटिंगचे स्क्रिनशॉट्सही तिने व्हायरल केले आहेत.
युवतीने काय केलाय दावा?
मी तुला सोडून जाण्याचा प्रयत्न केला, सर्व काही देवाच्या भरवशावर सोडले. परंतु ज्यारितीने तू माझ्यासारख्या मुलींचा वापर करतो, कदाचित हे सर्वांसाठी डोळे उघडणारा अनुभव असेल. मला अपेक्षा आहे तुझे कुटुंब तुला प्रामाणिक बनायला शिकवेल. हे यश नाही, खरे यश नात्यांमध्ये विश्वास, प्रामाणिकपणा आणि पवित्रता आहे. मुलींचा वापर करायचा आणि फेकून द्यायचे ही नीती नको. मी खूप काही बोलू शकते परंतु मला माझ्या आत डोकावून पाहायचे आहे. मी कर्मावर विश्वास ठेवते त्यामुळे मी तुझ्यापासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला. परंतु आता मला जाणीव झाली की तुमच्यासारखे लोक केवळ कर्माच्या भरवशावर सोडता येऊ शकत नाहीत कारण तुम्हाला देवाचीही भीती नाही असं तिने म्हटलं.
या युवतीने मागील आठवड्यात मुख्यमंत्री पोर्टलवरून यश दयालविरोधात लैंगिक शोषणाची तक्रार दिली होती. स्वत:ला ५ वर्ष यश दयालची गर्लफ्रेंड म्हणवणाऱ्या युवतीने म्हटलं की, त्याने आतापर्यंत ना माझ्या कायदेशीर नोटिशीला उत्तर दिले, ना माझ्या कुठल्याही प्रश्नाची उत्तरे दिली आहेत. सोशल मीडियावर युवती आणि यश दयाल यांचे अनेक फोटो व्हायरल झालेत. जेव्हा गुजरात टायटन्स पहिल्यांदा आयपीएल २०२२ ची चॅम्पियन बनली होती तेव्हा ही युवती नरेंद्र मोदी स्टेडिअमवर हजर होती. विजयानंतर तिने यश दयालसह अनेक जागतिक क्रिकेटपटूसोबत तिचे फोटो शेअर केले होते. यश दयाल आता आरसीबीचा वेगवान गोलंदाज आहे.
तक्रारीनुसार, यश दयालचे अनेक मुलींशी संबंध आहेत. गाझियाबाद पोलिसांनी युवतीची तक्रार नोंदवल्यानंतर यशला नोटीस पाठवली आहे. फेब्रुवारी २०२५ रोजी आरसीबी खेळाडूच्या लग्न समारंभातही युवती सहभागी झाली होती. इथेच युवतीने यश दयालसोबत साखरपुड्याविषयी विचारले होते. १७ एप्रिलला आणखी एका महिलेचा कॉल आला आणि तिने यश दयालसोबत संबंध असल्याचे पुरावे युवतीला दिले. अन्य ३ महिलांनीही असा दावा केला आहे. पॉवर, पैसे आणि फेम या नावाखाली प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला जात आहे. परंतु मला भारतीय न्याय व्यवस्थेवर विश्वास आहे असं या युवतीने म्हटलं आहे.