Smriti Mandhana Red Rose : भारतीय महिला क्रिकेट संघ इंग्लंड दौऱ्यावर आहे. या दोन्ही संघांमध्ये पाच सामन्यांची टी२० मालिका खेळली जात आहे. त्यात टीम इंडिया २-१ ने आघाडीवर आहे. या दोन्ही संघांमधील चौथा टी२० सामना ९ जुलैपासून सुरू होणार आहे. या सामन्यापूर्वी ओल्ड ट्रॅफर्ड स्टेडियमवर टीम इंडियाचे भव्य स्वागत करण्यात आले. मँचेस्टरच्या कौन्सिल जनरल ऑफ इंडियाने भारतीय महिला क्रिकेट संघाला ओल्ड ट्रॅफर्ड स्टेडियममध्ये आमंत्रित केले. या कार्यक्रमात महिला क्रिकेटपटूंचा सन्मान करण्यात आला.
स्मृती मन्धानाला मिळाला लाल गुलाब
मँचेस्टर येथील भारतीय परिषदेच्या जनरल विशाखा यदुवंशी म्हणाल्या, "तुम्ही भारताचे प्रतिनिधित्व करता. केवळ खेळातच नाही, तर आत्म्यानेही तुम्ही भारताचे प्रतिनिधित्व करता. तुमचा प्रवास केवळ क्रिकेटपुरता मर्यादित नाही, तर ही एक धाडसाची कहाणी आहे." त्यानंतर एका लहान मुलीने भारतीय महिला संघाची उपकर्णधार स्मृती मानधना हिला लाल गुलाब दिला. तर भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरचेही भव्य स्वागत करण्यात आले. पाहा व्हिडीओ-
लँकेशायर काउंटी क्रिकेट क्लबचे सीईओ डॅनियल गिडनी देखील कार्यक्रमाला उपस्थित होते. ते म्हणाले, "ओल्ड ट्रॅफर्ड हे सचिन तेंडुलकरच्या पहिल्या शतकासाठी प्रसिद्ध आहे. इतकेच नाही तर पुरुष क्रिकेटमध्ये येथे अनेक विक्रम झाले आहेत. गेल्या १० वर्षांपासून येथे महिला क्रिकेट सामनेही खेळले जात आहेत. आता येथे नवा इतिहास रचण्याची वेळ आली आहे."
टी२० मालिकेत टीम इंडिया आघाडीवर
या मालिकेत टीम इंडिया २-१ ने आघाडीवर आहे. मालिकेतील पहिला टी२० सामना टीम इंडियाने ९७ धावांनी जिंकला. या सामन्यात स्मृती मानधनाने तिचे पहिले टी२० शतक झळकावले. त्यानंतर टीम इंडियाने दुसरा टी२० सामनाही जिंकला. पण नंतर इंग्लंडने टी२० सामना ५ धावांनी जिंकत मालिकेतील चुरस कायम ठेवली.