Join us

Rishabh Pant India vs South Africa T20: मी विकेटकिपर का झालो? रिषभ पंतने सांगितला रंजक किस्सा

आफ्रिका मालिकेत रिषभवर उपकर्णधार पदाची जबाबदारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2022 11:30 IST

Open in App

Rishabh Pant IND vs SA: भारतीय संघ ९ जूनपासून दक्षिण आफ्रिकेशी टी२० मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठी नियमित कर्णधार रोहित शर्मा आणि माजी कर्णधार विराट कोहली या दोघांनाही विश्रांती देण्यात आली आहे. आगामी मालिका आणि टी२० वर्ल्ड कप असा व्यस्त कार्यक्रम पाहता त्यांच्याबाबतीत हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे या मालिकेसाठी लोकेश राहुलला संघाचे कर्णधारपद देण्यात आले असून २४ वर्षांचा रिषभ पंत टीम इंडियाचा उपकर्णधार असणार आहे. रिषभ पंत संघात विकेटकिपर-फलंदाज म्हणून समाविष्ट झाला होता. पण सुरूवातीला तो केवळ फलंदाजीसाठी ओळखला जायचा. नंतर त्याने आपल्या कामगिरीत सुधारण करत उत्तम यष्टीरक्षक म्हणून नाव कमावलं. पण त्याने यष्टीरक्षक होण्याचा निर्णय कसा घेतला, याबद्दल रिषभ पंतने स्वत: एक किस्सा सांगितला.

"माझी विकेटकिपिंग सुधारली आहे की नाही याबद्दल मी काहीही बोलणार नाही. कारण मी तसं बोलणं योग्य नाही. ती गोष्ट चाहत्यांनाच ठरवू दे. मी केवळ प्रयत्न करतो आहे. मी प्रत्येक सामन्यात माझ्याकडून १००टक्के उत्तम कामगिरी करण्याचा प्रयत्न करतोय. मी कायमच विकेटकिपर-फलंदाज म्हणून संघात होतो. पण मी लहानपणापासूनच किपिंग करायचो. मी विकेटकिपर का झालो असं मला अनेकदा विचारलं जातं. त्याचं कारण म्हणजे माझे वडिल विकेटकिपर होते. त्यांच्यासोबत खेळताना मी देखील विकेटकिपर झालो. माझ्या वडिलांना पाहून माझा विकेटकिपर हा प्रवास सुरू झाला", असा किस्सा रिषभ पंतने सांगितला.

“तुम्हाला चांगला विकेटकिपर व्हायचे असेल तर तुम्ही स्वतःला चपळ ठेवायला हवे. जर तुम्ही पुरेसे चपळ असाल तर तुम्ही सर्वोत्तम कामगिरी करू शकाल. दुसरी गोष्ट म्हणजे चेंडू शेवटपर्यंत पाहणे महत्त्वाचे असते. कधीकधी असे होते की चेंडू तुमच्या दिशेने येतोय हे आम्हाला माहित असते, त्यामुळे आम्ही रिलॅक्स राहतो, पण जोपर्यंत चेंडू पकडला जात नाही, तोपर्यंत चेंडूवर लक्ष ठेवणं महत्त्वाचं असतं. कारण शिस्तबद्ध आणि तंत्रशुद्ध कामगिरी करणं हेच सर्वात महत्त्वाचे असते", असंही रिषभने स्पष्ट केलं.

 

टॅग्स :भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकारिषभ पंतभारतीय क्रिकेट संघ
Open in App