Rohit Sharma, Team India Captaincy : Champions Trophy 2025चा अंतिम सामना ९ मार्च रोजी दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाईल. या सामन्यात टीम इंडियाचा सामना न्यूझीलंडशी (Ind vs NZ ) होईल. भारतीय कर्णधार रोहित शर्माच्या कारकिर्दीसाठी हा सामना खूप महत्त्वाचा असणार आहे. अनेक दिग्गज खेळाडूंचा असा विश्वास आहे की रोहित शर्मासाठी ही शेवटची आयसीसी स्पर्धा असू शकते. असे वृत्त आहे की तो अंतिम सामन्यानंतर कर्णधारपद सोडू शकतो आणि खेळाडू म्हणून खेळत राहू शकतो. अशा परिस्थितीत, रोहितच्या जागी वनडे संघाचा कर्णधार म्हणून सध्याचा उपकर्णधार शुबमन गिल ( Shubman Gill ) याच्यासह आणखी एक खेळाडूच्या नावाचीही चर्चा आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर टीम इंडियाचा कर्णधार कोण?
चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर रोहित शर्मा निवृत्त होईल की नाही, हा निर्णय पूर्णत्वे त्याच्यावरच अवलंबून आहे. पण असे मानले जाते की २०२७च्या वनडे विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर भारतीय वनडे संघाचा कर्णधार बदलला जाईल हे निश्चित आहे. त्याच वेळी, रोहित त्याला हवे तितका वेळ खेळू शकतो. अशा परिस्थितीत, सर्वात मोठा प्रश्न म्हणजे रोहितच्या जागी वनडे संघाचा कर्णधार कोण असेल. सध्या, भारतीय वनडे संघाचा उपकर्णधार शुभमन गिल आहे, परंतु तो थेट कर्णधार होऊ शकणार नाही, कारण कर्णधारपदाच्या शर्यतीत आणखी एक मोठा दावेदार आहे. जाणून घेऊया.
गिल सोबत शर्यतीत नाव कुणाचं?
मीडिया रिपोर्ट्सनुसार, शुबमन गिल शिवाय हार्दिक पांड्या देखील कर्णधारपदाच्या शर्यतीत आहे. हार्दिकने यापूर्वी टी२० फॉरमॅटमध्ये टीम इंडियाचे नेतृत्व केले आहे. अशा परिस्थितीत, जर निवडकर्त्यांनी हार्दिकवर विश्वास दाखवला तर गिल उपकर्णधारपदी कायम राहील. पण जर गिल आणि हार्दिक यांच्यावर एकमत झाले नाही, तर अशा परिस्थितीत तिसरा दावेदार देखील शर्यतीत उतरू शकतो. सध्यातरी तो दावेदार केएल राहुल असल्याची चर्चा आहे. २०२७च्या वनडे विश्वचषकाच्या तयारीसाठी किमान दोन वर्षांची तयारी गरजेची आहे. रोहित २०२७चा वनडे वर्ल्डकप खेळण्याची शक्यता खूपच धुसर आहे. कारण तो तेव्हा ३९ वर्षांचा असेल. त्यामुळे चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर नवा कर्णधार निवडला जाण्याची सर्वाधिक शक्यता आहे.