Join us

गिल, जैस्वालने गाळला घाम, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय फलंदाजांचा कसून सराव, दीड तास केली फलंदाजी

Indian Cricket Team: मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधून कसोटी क्रिकेटसाठी जुळवून घेण्याच्या लक्ष्याने भारतीय कर्णधार शुभमन गिल याने मंगळवारी ईडन गार्डन्सवरील भारतीय संघाच्या सराव सत्रात बराच वेळ फलंदाजीचा सराव केला. त्याने जवळपास दीड तास फलंदाजी करीत आपल्या तंत्रावर काम केले.

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2025 06:41 IST

Open in App

कोलकाता -  मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधून कसोटी क्रिकेटसाठी जुळवून घेण्याच्या लक्ष्याने भारतीय कर्णधार शुभमन गिल याने मंगळवारी ईडन गार्डन्सवरील भारतीय संघाच्या सराव सत्रात बराच वेळ फलंदाजीचा सराव केला. त्याने जवळपास दीड तास फलंदाजी करीत आपल्या तंत्रावर काम केले. त्याच्यासोबत यशस्वी जैस्वाल आणि साई सुदर्शन यांनीही नेट्समध्ये घाम गाळला. 

दक्षिण आफ्रिका संघाचा आत्मविश्वास उंचावलेला आहे. कारण, गेल्या महिन्यात त्यांनी प्रतिकूल परिस्थितीत पाकिस्तानविरुद्धची दोन कसोटींची मालिका १-१ अशी अनिर्णीत ठेवली होती. गिलने वेस्ट इंडिजविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांमध्ये अर्धशतक आणि नाबाद शतक झळकावले होते. पण, त्यानंतर मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये त्याची कामगिरी अपेक्षेप्रमाणे झाली नाही. ऑस्ट्रेलियातील एकदिवसीय आणि टी-२० मालिकांमध्ये आठ डावांत तो अर्धशतकही करू शकला नाही. परंतु, कसोटी संघाची जबाबदारी मिळाल्यानंतर गिल पूर्णपणे एकाग्र दिसला आणि आपला फॉर्म परत मिळविण्यासाठी त्याने सराव सत्रात कठोर मेहनत घेतली.

नेट सराव सुरू होण्यापूर्वी मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि सहायक प्रशिक्षक सितांशू कोटक यांनी गिलसोबत दीर्घ चर्चा केली. यावेळी दोघांनी गिलसोबत फलंदाजीच्या तंत्राबाबत चर्चा केल्याची शक्यता आहे.  यानंतर गिलने स्लिप क्षेत्ररक्षणाचा सराव केला आणि मग जैस्वालसोबत नेटमध्ये फलंदाजीसाठी उतरला. त्याने सुरुवातीला फिरकीपटू रवींद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदरचा सामना केला. त्यानंतर, त्याने जसप्रीत बुमराह, नितीश कुमार रेड्डी यांचा सामना केला आणि काही स्थानिक गोलंदाजांविरुद्धही फलंदाजी केली.

उसळणाऱ्या चेंडूंचा सरावसहायक प्रशिक्षकांनी साइडआर्मने थ्रोडाउन करत गिलला उसळणाऱ्या आणि वेगवान चेंडूंवर सराव करण्याची संधी दिली. नेटमध्ये एक तासाहून अधिक वेळ घालविल्यानंतर गिलने गोलंदाजी प्रशिक्षक मॉर्ने मॉर्केल यांच्या देखरेखीखाली सुमारे ३० मिनिटे थ्रोडाउनचा सराव केला. रणजी करंडक स्पर्धेत राजस्थानविरुद्ध ६७ आणि १५६ धावांची खेळी करणारा यशस्वीही दीर्घकाळ नेटवर दिसला. त्याने शानदार ड्राइव्ह व पूल शॉट्स मारले. त्याचप्रमाणे, भारत ‘अ’ संघाकडून फारशी छाप पाडू न शकलेल्या सुदर्शननेही बराच वेळ फलंदाजी केली. 

जसप्रीत बुमराहच्या गुडघ्यावर पट्टीयष्टिरक्षक-फलंदाज ध्रुव जुरेलने दक्षिण आफ्रिका ‘अ’विरुद्ध दुसऱ्या सामन्यात दोन्ही डावांत शतक झळकावून कसोटी संघात विशेषतः तिसऱ्या क्रमांकासाठी आपली दावेदारी मजबूत केली आहे. भारत ‘अ’ संघातून खेळलेल्या खेळाडूंनी या ऐच्छिक सराव सत्रात सहभाग घेतला नाही. परंतु, जसप्रीत बुमराहने लक्ष वेधले. त्याने सुमारे १५ मिनिटे ऑफ स्टम्पवर लक्ष ठेवून गोलंदाजी केली. यावेळी, त्याच्या उजव्या गुडघ्यावर पट्टी बांधलेली दिसली. त्याने गंभीर, मॉर्केल यांच्या देखरेखीखाली सराव पूर्ण केला.

खेळपट्टीवर गवतसुमारे तीन तासांच्या सराव सत्रानंतर गंभीर, कोटक, मॉर्केल आणि गिल यांनी मुख्य खेळपट्टीची पाहणी केली आणि तिथे बराच वेळ चर्चा केली. मॉर्केल आणि गिल यांनी क्युरेटर सुजन मुखर्जी यांच्याशीही १५ मिनिटे संवाद साधला. खेळपट्टी तपकिरी रंगाची असून, तिच्यावर थोडी गवताची छटा दिसत होती. या मैदानावर झालेल्या दोन रणजी सामन्यांमध्ये भारतीय वेगवान गोलंदाज आकाश दीप आणि मोहम्मद शमी यांना पहिल्या दिवशी काहीसे झुंजावे लागले होते.  बंगाल क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी आधीच स्पष्ट केले आहे की, संघ व्यवस्थापनाने फिरकीसाठी अनुकूल खेळपट्टी तयार करण्याची कोणतीही मागणी केलेली नाही. 

ईडन गार्डन्सवर कडेकोट सुरक्षादिल्लीत झालेल्या बॉम्बस्फोटाच्या पार्श्वभूमीवर ईडन गार्डन मैदानावर कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली.  भारत-द. आफ्रिका यांच्यात शुक्रवारपासून येथे पहिली कसोटी सुरू होत आहे. दोन्ही संघ शहरात कालच दाखल झाले. खेळाडूंचे वास्तव्य असलेल्या हॉटेल परिसरातही सुरक्षा वाढविण्यात आली. शहरात येणाऱ्या वाहनांची कसून तपासणी सुरू असून, संघाच्या सराव सत्रातही पोलिस हजर होते.   

English
हिंदी सारांश
Web Title : Gill, Jaiswal sweat it out; Indian batsmen practice hard.

Web Summary : Shubman Gill, Yashasvi Jaiswal, and Sai Sudarshan intensely practiced at Eden Gardens, preparing for the South Africa Test series. Gill focused on adapting to Test cricket, while the team assessed the pitch conditions amidst heightened security.
टॅग्स :भारतीय क्रिकेट संघभारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका