ICC Champions Trophy: वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला तंदुरुस्त नसल्यामुळे चॅम्पिअन्स ट्रॉफी स्पर्धेसाठी संघातून वगळल्याचे बीसीसीआयने जाहीर केलं. यामुळे चॅम्पिअन्स ट्रॉफीसाठी स्पर्धेआधीच भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. मात्र आता बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने जसप्रीत बुमराहच्या निवडीवरुन मोठा दावा केला आहे. तंदुरुस्तीचे कारण देत बुमराला चॅम्पिअन्स ट्रॉफीसाठी संधी नाकारण्यात आली आहे. अजित आगरकरच्या निवड समितीने जसप्रीत बुमराहला वगळलं आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारताने १५ सदस्यीय संघ आधीच जाहीर केला होता. त्यानंतर संघ जाहीर करण्याच्या शेवटच्या दिवशी बीसीसीआयने जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खेळू शकणार नसल्याचे जाहीर केलं आहे. त्याच्या जागी हर्षित वर्माचा समावेश करण्यात आला आहे. तर यशस्वी जैस्वालच्या जागी १५ सदस्यीय संघात समावेश करण्यात आला आहे. मात्र आता बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने बुमराहबाबत केलेल्या विधानामुळे खळबळ उडाली आहे.
बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर पीटीआयला बुमराहला वगळ्याबाबत मोठा दावा केला आहे. “बुमराहला पाच आठवड्यांसाठी विश्रांती घेण्यास सांगितलं होतं. त्यानंतर त्याचे एनसीएमध्ये स्ट्रेंथ अँड कंडिशनिंग ट्रेनर रजनीकांत आणि फिजिओ थुलसी यांच्या मार्गदर्शनाखाली पुनर्वसन करण्यात आलं. एनसीएचे प्रमुख नितीन पटेल यांनी पाठवलेला त्याचा अहवाल चांगला दिसत होता. पण चॅम्पियन्स ट्रॉफीपर्यंत तो गोलंदाजी सुरू करू शकेल की नाही हे स्पष्ट झाले नाही. त्यानंतर मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांना शेवटचा निर्णय घेण्यास सांगितले होते, असं बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने सांगितलं.
“यानंतर संघात अनफिट खेळाडूला खेळाडूचा समावेश करून कोणाला धोका पत्करायचा नव्हता. सामन्याच्या मध्यावर बुमराहला पुन्हा दुखापत झाली तर ते खूपच लाजिरवाणे झाले असते. जर वैद्यकीय पथकाने पूर्णपणे हिरवा कंदील दाखवला नाही, तर निवड समिती तो धोका कसा घेऊ शकते. २०२२ मध्ये बुमराहबाबत अशी चूक एकदा झाली आहे. त्यामुळे आगरकरला ही जोखमी घ्यायची नव्हती,” असेही अधिकाऱ्याने म्हटलं.