India Women vs Sri Lanka Women 2nd T20I Vaishnavi Sharma And Sree Charani Shine : विशाखापट्टणमच्या मैदानातील दुसऱ्या टी-२० सामन्यातही भारतीय महिला संघाने पाहुण्या श्रीलंकेच्या संघाला मोजक्या धावांत आटोपल्याचे पाहायला मिळाले. हरमनप्रीत कौरनं मालिकेतील दुसऱ्या सामन्यातही नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. क्रांती गौड हिने पहिल्याच षटकातील अखेरच्या चेंडूवर श्रीलंकेची सलामीची बॅटर विश्मी गुणरत्ने हिला अवघ्या एका धावेवर पॅव्हेलियनमध्ये धाडले. त्यानंतर चांगली सुरुवात मिळूनही एकाही श्रीलंकन बॅटर्सला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. परिणामी निर्धारित २० षटकात श्रीलंकेच्या संघाला निर्धारित २० षटकात ९ विकेट्सच्या मोबदल्यात १२८ धावा करत भारतीय महिला संघासमोर १२९ धावांचे लक्ष्य ठेवले आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
श्रीलंकेकडून चार चौघींनी दुहेरी आकडा गाठला, पण...
श्रीलंकन कर्णधार चारमी अट्टापटूनं २४ चेंडूत केलेल्या ३१ धावांच्या खेळीशिवाय हसिनी परेरा २२ (२८), हर्शिथा समरवीक्रमा ३३ (३२) आणि कविशा दिलहारी १४ (१८) या तिघींनी दुहेरी आकडा गाठला. पण एकीलाही चांगली सुरुवात मिळूनही मोठी खेळी करता आली नाही. भारताकडून वैष्णवी शर्मा आणि श्री चरणी हिने प्रत्येकी २-२ विकेट्स घेतल्या. स्नेह राणा आणि क्रांती गौड यांनी प्रत्येकी १-१ विकेट्स आपल्या खात्यात जमा केली. याशिवाय श्रीलंकेच्या संघाने ३ विकेट्स या धावबादच्या स्वरुपात गमावल्याचे पाहायला मिळाले.
दुसऱ्या सामन्यात वैष्णवीनं उघडलं विकेट्सच खातं; बॅटरनं हवेत चेंडू मारल्यावर श्री चरणीकडे पाहून जोडले हात
अंडर १९ वर्ल्ड कप स्पर्धेसह देशांतर्गत क्रिकेटमध्ये कमालीची कामगिरी केल्यावर वैष्णवी शर्माला श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेतून टी-२० संघाकडून पदार्पणाची संधी मिळाली. पहिल्या सामन्यात पहिल्याच षटकात तिने विकेटचा डाव साधला होता. पण श्री चरणी हिने झेल सोडला आणि तिच्या पहिल्या विकेटची संधी हुकली. कमालीचा योगायोग म्हणजे दुसऱ्या सामन्यात तिने जी पहिली विकेट घेतली त्यात श्री चणीने हातभार लावला. तिच्याकडे झेल गेल्यावर वैष्णवीने प्लीज कॅच घे हा...असे म्हणत हात जोडल्याचेही पाहायला मिळाले. हा सामन्यातील एक खास क्षण ठरला.