India Women vs South Africa Women Final Toss Delayed Due To Rain : आयसीसी महिला विश्वचषक २०२५ स्पर्धेतील भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील अंतिम सामना नवी मुंबईतील डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे. दोन्ही संघ पहिली वहिली वर्ल्ड कप स्पर्धा जिंकण्याच्या इराद्याने मैदानात उतरणार आहेत. भारतीय प्रमाणवेळेनुसार हा सामना ३ वाजता सुरु होणं अपेक्षित होते. पण पावसामुळे नाणफेक नियोजित वेळेत होऊ शकलेली नाही.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
टॉसची वेळ बदलली, पण पुन्हा पावसाने सुरु केली बॅटिंग
मैदानात असलेला ओलाव्यामुळे टॉसला विलंब होत असून ३ वाजता नाणेफेकीनंतर ३ वाजून ३० मिनिटांनी हा सामना सुरु होईल, अशी माहिती BCCI नं अधिकृत एक्स अकाउंटवरुन दिली. पण पावसाने पुन्हा बॅटिंग सुरु केल्यामुळे या वेळेतही टॉस होण्याची शक्यता कमी झाली आहे. हा सामना ५ वाजेपर्यंत सुरु झाला तरी पूर्ण षटकांचा सामना खेळवला जाईल, असे समालोचक आकाश चोप्रा यांनी स्पष्ट केले आहे.
एक राखीव दिवस! त्यातही सामना होऊ शकला नाही तर टीम इंडियाला बसेल फटका
भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील फायनल सामन्यासाठी एक राखीव दिवस ठेवण्यात आला आहे. जर पावसाने सामन्यात अडथळा आणला तरजिथं सामना थांबेल तिथून पुढे सामना पुन्हा सुरु केला जाईल. पण या राखीव दिवसातही पावसाने खेळखंडोबा केला तर मात्र याचा मोठा फटका भारतीय संघाला बसेल. कारण या परिस्थितीत गुणतालिकेत टॉपरला विश्वविजेता घोषित करण्यात येईल. त्यामुळे पावसाची बॅटिंग थांबून दोन्ही संघातील खेळाडू मैदानात उतरावेत आणि सामना पूर्ण षटकांचा व्हावा, अशीच भारतीय क्रिकेट चाहत्यांची इच्छा असेल.