India vs Zimbabwe Super 8 T20 World Cup 2026 Live Streaming : आयसीसी टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील सुपर ८ मधील पहिल्या गटात भारतीय संघ चेन्नईच्या चेपॉकच्या मैदानात झिम्बाब्वेविरुद्ध आपला दुसरा सामना खेळणार आहे. २६ फेब्रुवारीला रंगणारा हा सामना भारतीय संघासाठी स्पर्धेतील आव्हान टिकवून ठेवण्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. यंदाच्या हंगामातील जेतेपदाचा दावेदार असलेली टीम इंडियाची झिम्बाब्वेविरुद्धची लढत 'करो वा मरो'ची होईल अशी कल्पनाही कुणी केली नव्हती. पण सुपर ८ मधील पहिल्या पराभवानंतर आता टीम इंडियासाठी उर्वरित सर्वच लढती महत्त्वाच्या झाल्या आहेत. झिम्बाब्वेच्या संघाने यंदाच्या हंगामात ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंकेविरुद्ध मोठा उलटफेर करुन दाखवला आहे. त्यामुळे पहिला सामना गमावल्यामुळे अडचणीत सापडलेली टीम इंडिया त्यांना हलक्यात घेणार नाही. इथं जाणून घेऊयात IND vs ZIM यांच्यातील सामना कधी कुठं आणि कसा पाहता येईल यासंदर्भातील सविस्तर माहिती...
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!
एक पराभव अन् 'जर-तर'च्या समीकरणात अडकली टीम इंडिया
भारतीय संघाने यंदाच्या हंगामात दमदार कामगिरी केली. पण सुपर ८ मधील दक्षिण आफ्रिकेविरुद्ध संघाला ७६ धावांनी पराभवाचा धक्का बसला. या एका पराभवामुळे भारतीय संघ सेमीच्या शर्यतीत 'जर तर'च्या समीकरणात अडकला आहे. भारतीय संघाला उर्वरित दोन्ही सामने जिंकायचे आहेत. झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यासाठी मैदानात उतरण्याआधी वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील निकालासह टीम इंडियाला नेट रनरेटवर जोर द्यायचा की, उर्वरित सामने फक्त जिंकायचे हे चित्रही स्पष्ट झालेले असेल. जर वेस्ट इंडिजचा संघ पराभूत झाला तर उर्वरित दोन सामने जिंकले तरी टीम इंडिया सेमीफायनलमध्ये प्रवेश करू शकते. याउलट दक्षिण आफ्रिकेनं हा सामना गमावला तर टीम इंडियाचा मार्ग आणखी खडतर होईल.
T20 WC 2026 : कसा आहे WI vs SA यांच्यातील हेड टू हेड रेकॉर्ड! आकडेवारी टीम इंडियाला दिलासा देणारी की,...
टीम इंडियाच्या फलंदाजीची चिंता
टीम इंडियाचा युवा सलामीवीर अभिषेक शर्मासह आघाडीच्या फळीतील फलंदाजांमध्ये सातत्यपूर्ण कामगिरीचा अभाव दिसला आहे. एवढेच नाही तर छोट्या छोट्या भागीदारीसह डाव बहरण्यात टीम इंडिया कमी पडताना दिसली. या उणीवा भरून काढण्याचे मोठे चॅलेंज टीम इंडियासमोर आहे.
टिम इंडियाला झिम्बाब्वेच्या कॅप्टनसह 'या' गोलंदाजांपासून रहावे लागेल जपून
ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंकेला दणका देत झिम्बाब्वेच्या संघाने आपली क्षमता दाखवून दिली आहे. पण वेस्ट इंडिज विरुद्धच्या सामन्यात क्षेत्ररक्षणात केलेल्या चुका त्यांना महागात पडल्या. शिमरॉन हेटमायरला त्यांनी एकदा नव्हे दोन वेळा जीवनदान दिले. या चुका टाळून ते टीम इंडियाला चॅलेंज देणार का? ते पाहण्याजोगे असेल. चेन्नईच्या परिस्थितीत ब्लेसिंग मुजाराबानी, ब्रॅड इव्हान्स, रिचर्ड नगरावा आणि सिकंदर रझा टीम इंडियासाठी धोकादायक ठरू शकतात.
कधी आणि कुठे पाहता येईल सामना?
भारत विरुद्ध झिम्बाब्वे यांच्यातील सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम अर्थात चेपॉकच्या मैदानात खेळवण्यात येणार आहे. सायंकाळी ७ वाजता सामन्यातील पहिला चेंडू फेकला जाईल. त्याआधी अर्धातास अगोदर दोन्ही संघ नाणेफेकीसाठी मैदानात उतरतील. भारतीय संघाने आतापर्यंत पहिल्यांदा फलंदाजी करताना सामने जिंकले आहेत. त्यामुळे या सामन्यात नाणेफेकीचा कौलही महत्त्वपूर्ण असेल. जिओहॉटस्टार अॅप आणि वेबसाइटवर IND vs ZIM लाईव्ह स्ट्रीमिंग उपलब्ध असेल. तसेच स्टार स्पोर्स नेटवर्कवर या सामन्याचे थेट प्रेक्षपण होईल.