India vs West Indies Test Series : सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारतीय टी २० संघ सध्या आशिया चषक स्पर्धेत धमाका करत आहे. या स्पर्धेनंतर काही दिवसांतच भारतीय संघ शुबमन गिलच्या नेतृत्वाखालील वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेअंतर्गत वेस्ट इंडिज विरुद्धची मालिका खेळणार आहे. घरच्या मैदानात रंगणाऱ्या या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारतीय संघाला स्टार विकेट किपर बॅटर रिषभ पंतशिवायच मैदानात उतरावे लागू शकते, अशी माहिती समोर येत आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
कधी पासून रंगणार भारत-वेस्ट इंडिज यांच्यातील कसोटी मालिका?
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील कसोटी मालिकेला २ ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. या कसोटी मालिकेतील पहिला सामना हा अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवण्यात येणार येईल. या कसोटी मालिकेसाठी बीसीसीआय निवड समिती याच आठवड्यात संघाची घोषणा करू शकते. क्रिकइन्फोच्या वृत्तानुसार, २४ सप्टेंबरला निवड समितीची बैठक पार पडणार आहे. त्यानंतर कसोटी संघाची घोषणा केली जाईल.
अशी धुलाई कधीच पाहिली नव्हती...; अभिषेक शर्माच्या फटकेबाजीनंतर पाकिस्तानी पत्रकाराची कबुली
इंग्लंड दौऱ्यावर दुखापतग्रस्त झाला होता पंत
वेस्ट इंडिज विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी १५ सदस्यीय संघाची निवड करण्यात येणार आहे. या मालिकेतून पंत कमबॅक करेल, अशी आस होती. पण सध्या ते शक्य दिसत नाही. इंग्लंड दौऱ्यावरील तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफी स्पर्धेतील चौथ्या कसोटी सामन्यात रिषभ पंत दुखापतग्रस्त झाला होता. परिणामी तो पाचव्या कसोटी सामन्याला मुकला होता. रिषभ पंत सध्या “बंगळुरु स्थित सेंटर ऑफ एक्सलेन्समध्ये स्ट्रेंथ अँड कंडीशनिंग प्रक्रियेतून जात आहे. बीसीसीआय त्याच्या फिटनेस अपडेट्सवर लक्ष ठेवून आहे.
पंतच्या अनुपस्थितीत कोण?
भारतीय कसोटी संघात रिषभ पंतच्या बॅकअपच्या रुपात ध्रुव जुरेल सातत्याने संघासोबत आहे. पंत दुखापतग्रस्त झाल्यावर इंग्लंड दौऱ्यावर त्यालाच पसंती मिळाली होती. ऑस्ट्रेलिया 'अ' विरुद्धच्या अनौपचारिक कसोटी सामन्यात तो भारतीय 'अ' संघाचे नेतृत्वही करतोय. त्याला विकेट किपर बॅटरच्या रुपात वेस्ट इंडिज विरुद्धच्या कसोटी सामन्यात भारतीय संघात संधी मिळू शकते. याशिवाय एन. जगदीशन याच्या नावाचाही पर्याय टीम इंडियासमोर असेल.