India vs West Indies, 1st Test, IND vs WI 1st Test Day 2 Stump : अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर सुरु असलेल्या वेस्ट इंडिज विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यावर भारतीय संघाने मजबूत पकड मिळवलीये. केएल राहुल पाठोपाठ ध्रुव जुरेल आणि रवींद्र जडेजाच्या नाबाद शतकाच्या जोरावर दुसऱ्या दिवसाअखेर भारतीय संघाने ५ विकेट्सच्या मोबदल्यात ४४८ धावा करत २८६ धावांची आघाडी घेतली होती. दुसऱ्या दिवसाचा खेळ थांबला त्यावेळी रवींद्र जडेजा १७६ चेंडूत नाबाद १०४ धावांवर तर वॉशिंग्टन सुंदर ९ धावांवर खेळत होता.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
केएल राहुल-गिल यांच्यात दमदार भागीदारी, पण...
भारतीय कसोटी संघाचा कर्णधार शुबमन गिल आणि लोकेश राहुल यांनी २ बाद १२१ धावांवरून दुसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात केली. ही जोडी जमलीये असं वाटत असताना शुबमन गिलच्या रुपात रॉस्टन चेस याने टीम इंडियाला तिसरा धक्का दिला. गिल १०० चेंडूत ५० धावा करून परतला. त्याने लोकेश राहुलसोबत तिसऱ्या विकेटसाठी ९८ धावांची भागीदारी रचली. शुबमन गिल अर्धशतकावर अडखळल्यावर लोकेश राहुल बरोबर १०० धावा करून बाद झाला.
नवरोबानं सेंच्युरी मारल्यावर वाजवली शिट्टी! बायकोनं ती खास 'फ्रेम' केली व्हायरल
मग ध्रुव जुरेल अन् जड्डू जोडी जमली
विकेट किपर बॅटर ध्रुव जुरेलसाठी हा सामना खास राहिला. पंतच्या अनुपस्थितीत मिळालेल्या संधीचं सोनं करताना त्याने कसोटी कारकिर्दीतील पहिले शतक झळकावले. त्याने जड्डूसोबत पाचव्या विकेटसाठी २०६ धावांची तगडी भागीदारी रचली. ध्रुव जुरेल १२५ धावांवर बाद झाला. तो परतल्याव जड्डूच्या रुपात टीम इंडियाला दुसऱ्या दिवसाच्या खेळात तिसरा शतकवीर मिळाला. वॉशिंग्टनच्या साथीनं सहाव्या विकेटसाठी त्याने २४ धावांची भागादीरी केली होती.
धावांनी नव्हे डावानं पराभूत करण्याच्या दिशेनं वाटचाल
टीम इंडियाने वेस्ट इंडिजच्या संघाला पहिल्या डावात अवघ्या १६२ धावांत आटोपले होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी भारतीय संघाने २८० पेक्षा अधिक धावांची आघाडी घेतली. अजूनही टीम इंडियाच्या हातात पाच विकेट्स आहेत. त्यामुळे पहिल्या डावात मोठी धावसंख्या उभारून भारतीय संघ पाहुण्या संघाला डावाने पराभूत करण्याच्या दिशेनं वाटचाल करतोय.