नवी दिल्ली, भारत वि. वेस्ट इंडिजः टीम इंडियाच्या आगामी वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी निवडलेल्या संघात शुबमन गिल आणि अजिंक्य रहाणे यांना वन डे संघात स्थान न मिळाल्यानं आश्चर्य व्यक्त केले जात आहे. भारतीय संघ चौथ्या क्रमांकाचा तीढा अजून सोडवू शकलेला नाही आणि त्यामुळे वन डे संघात गिल किंवा रहाणे यांना संधी द्यावी अशी मागणी होत होती. पण, निवड समितीनं सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या गिलच्या नावाचा विचारही केला नाही, तर रहाणेला कसोटीसाठीच मर्यादित ठेवणे योग्य समजले. पण, आता आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनंही ( आयसीसी) गिलला संधी न देण्यावरून प्रश्न विचारला आहे.
India Vs West Indies : भारतीय संघ निवड समितीवर 'दादा'ची टीका, सर्वांना खूश ठेवण्याचा आटापिटा सोडा
वर्षाच्या सुरुवातीला न्यूझीलंड दौऱ्यात गिल दोन वन डे सामने खेळला होता. त्यामुळे विंडीज दौऱ्यातील संघात त्याचे नाव सर्वांना अपेक्षित होते. शिवाय त्यानं भारत A संघाकडून विंडीज दौऱ्यात दमदार कामगिरीही केली होती. भारत A संघाने वन डे मालिकेत वेस्ट इंडिज A संघाला 4-1 असे पराभूत केले होते. या मालिकेत गिलने 54.50च्या सरासरीनं सर्वाधिक 218 धावाही चोपल्या होत्या.
गिलनेही निवड समितीच्या निर्णयावर नाराजी प्रकट केली. तो म्हणाला,''या दौऱ्यातील एका तरी संघात स्थान मिळेल, अशी आशा होती. पण, संघ जाहीर झाल्यानंतर मी निराश झालो. त्यामुळे याचा अधिक विचार करण्यात वेळ वाया घालवायचा नाही. सातत्यपूर्ण कामगिरी करत राहणं माझं लक्ष्य आहे आणि त्याच जोरावर निवड समितीचे लक्ष खेचण्याचा निर्धार आहे.''
2018मध्ये न्यूझीलंडमध्ये झालेल्या 19 वर्षांखालील वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय संघाने जेतेपद पटकावले. या स्पर्धेत गिलने 372 धावा चोपल्या. सातत्यपूर्ण कामगिरी करूनही गिलला संधी न मिळाल्यानं क्रिकेट चाहते निराश आहेत.
आयसीसीनंही गिलच्या समावेशावरून एक ट्विट करत, चाहत्यांना प्रश्न विचारला आहे.
टी-20 मालिकेसाठी भारतीय संघ - टी-20 - विराट कोहली (कर्णधार) रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखर धवन, केएल राहुल, मनीष पांडे, श्रेयस अय्यर, रिषभ पंत (यष्टीरक्षक), कृणाल पांड्या, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, राहुल चहर, भुवनेश्वर कुमार, खलील अहमद, दीपक चहर, नवदीप सैनी
वनडे मालिकेसाठी भारतीय संघ -
वनडे - विराट कोहली ( कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखर धवन, के.एल. राहुल, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, केदार जाधव, मोहम्मद, भुवनेश्वर कुमार, खलील अहमद, नवदीप सैनी
कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ -
कसोटी - विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), मयांक अग्रवाल, के.एल. राहुल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, रोहित शर्मा, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), वृद्धिमान साहा (यष्टीरक्षक), रवीचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमरा, उमेश यादव