India vs West Indies 3rd ODI : भारतीय संघाने तिसऱ्या वन डे सामन्यात दणदणीत विजय मिळवून वेस्ट इंडिजविरुद्धची मालिका २-१ अशी जिंकली. शुबमन गिल, इशान किशन, हार्दिक पांड्या व संजू सॅमसन यांच्या अर्धशतकांच्या जोरावर भारताने धावांचा डोंगर उभा केला. त्यानंतर मुकेश कुमारने पहिल्याच स्पेलमध्ये विंडीजचे ३ फलंदाज १७ धावांवर तंबूत पाठवले. शार्दूल ठाकूरने ४ व कुलदीप यादवने २ धक्के दिले आणि भारताचा दणदणीत विजय पक्का केला. विंडीजविरुद्धचा हा सलग १३ वा वन डे मालिका विजय ठरला. २००७ पासून भारतीय संघ अपराजित आहे.
शुबमन गिलने मोडला पाकिस्तानी फलंदाजाचा वर्ल्ड रेकॉर्ड; इशान किशनचाही विक्रमांचा पाऊस
इशान व शुबमन यांनी पहिल्या विकेटसाठी १४३ धाव जोडल्या. इशान ८ चौकार व ३ षटकारांसह ७७ धावांवर बाद झाला. संजू सॅमसनने ४१ चेंडूंत २ चौकार व ४ खणखणीत षटकार खेचून ५१ धावांची खेळी केली. शुबमन ९२ चेंडूंत ११ चौकारांच्या मदतीने ८५ धावांवर झेलबाद झाला. या विकेटनंतर हार्दिक व सूर्यकुमार यादव यांनी चांगला खेळ करताना ४९ चेंडूंत ६५ धावांची भागीदारी केली. सूर्या ३० चेंडूंत ३५ धावांवर झेलबाद झाला. हार्दिकने ५२ चेंडूंत ४ चौकार व ५ षटकारांसह नाबाद ७० धावा करताना भारताला ५ बाद ३५१ धावांपर्यंत पोहोचवले. एकाही फलंदाजाला शतक झळकावता आले नसूनही भारताने केलेली ही सर्वोत्तम धावसंख्या ठरली. यापूर्वी २००५मध्ये श्रीलंकेविरुद्ध ६ बाद ३५० धावा भारताने केल्या होत्या.