शुबमन गिलने मोडला पाकिस्तानी फलंदाजाचा वर्ल्ड रेकॉर्ड; इशान किशनचाही विक्रमांचा पाऊस

India vs West Indies 3rd ODI Marathi : भारतीय संघाने तिसऱ्या वन डे सामन्यात ५ बाद ३५१ धावांचा डोंगर उभा केला आणि प्रत्युत्तरात मुकेश कुमारने वेस्ट इंडिजच्या ३ फलंदाजांना १७ धावांत तंबूचा रस्ता दाखवला. या सामन्यात इशान किशनने विक्रमांचा पाऊस पाडला, परंतु शुबमन गिलने वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवला.

जयदेव उनाडकटने ( Jaydev Undadkat) जवळपास १० वर्षांनंतर भारताच्या वन डे संघात पुनरागमन केले. ९ वर्ष व २५२ दिवस, असे दोन वन डे सामन्यात सर्वाधिक गॅप राहिलेला तो भारतीय खेळाडू ठरला. यापूर्वी रॉबिन सिंगच्या ( १९८९-९६) दोन सामन्यांमधील अंतर हे ७ वर्ष व २३० दिवसांचे होते. त्यानंतर अमित मिश्रा ( ६ वर्ष व १६० दिवस), पार्थिव पटेल ( ६ वर्ष व १३३ दिवस) आणि रॉबिन उथप्पा ( ५ वर्ष व ३४४ दिवस) यांचा क्रमांक येतो.

इशानने या मालिकेत ५२ ( ४६), ५५ ( ५५) आणि ७७ (६४) असे सलग तीन अर्धशतक झळकावले आहेत. वेस्ट इंडिजविरुद्धचे हे त्याचे तिसरे अर्धशतक ठरले अन् वन डेत भारतीय यष्टिरक्षकाने विंडीजविरुद्ध ३ शतक झळकावण्याची ही दुसरी वेळ ठरली. महेंद्रसिंग धोनीने विंडीजविरुद्ध तीन अर्धशतकं झळकावली आहेत. एका मालिकेत सलग तीन अर्धशतक झळकावणारा इशान हा भारताचा सहावा फलंदाज ठरला.

इशान किशनने ८ चौकार व ३ षटकारांसह ७७ धावांची केळी केली व शुबमनसह १४३ धावांची भागीदारी केली. वेस्ट इंडिजमधील वन डे तील भारतीय सलामीवीरांची ही सर्वोत्तम भागीदारी ठरली. यापूर्वी २०१७मध्ये शिखर धवन व अजिंक्य रहाणे यांनी १३२ धावांची भागीदारी केली होती. त्यांनी २०१३ साली शिखर धवन व रोहित शर्मा यांचा १२३ धावांचा विक्रम मोडला होता.

भारताने ५ बाद ३५१ धावांपर्यंत मजल मारली. एकाही फलंदाजाला शतक झळकावता आले नसूनही भारताने केलेली ही सर्वोत्तम धावसंख्या ठरली. यापूर्वी २००५मध्ये श्रीलंकेविरुद्ध ६ बाद ३५० धावा भारताने केल्या होत्या. २००४ मध्ये पाकिस्तानविरुद्ध ७ बाद ३४९ धावा चोपल्या होत्या.

शुबमन गिलने आजच्या सामन्यात ८५ धावा करून पाकिस्तानचा इमान उल हक याच्या नावावरील वर्ल्ड रेकॉर्ड मोडला. शुबमनने २७ वन डे सामन्यांत ६२.४८च्या सरासरीने १४३७ धावा करून पाकिस्तानी फलंदाजाचा रेकॉर्ड मोडला. पहिल्या २७ वन डे सामन्यांत सर्वाधिक धावांचा विक्रम शुबमनच्या नावावर नोंदवला गेला. इमानने १३८१ धावा केल्या होत्या.