कोलकाता - भारताला त्यांच्याच देशात नमवण्याची आमच्याकडे मोठी संधी आहे. दोन सामन्यांची ही कसोटी मालिका जिंकणे आमच्यासाठी महत्त्वाचे आहे. हा मालिका विजय जागतिक कसोटी अजिंक्यपद (डब्ल्यूटीसी) विजेतेपदानंतरचा दुसरा सर्वात मोठा विजय ठरेल, असे दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार तेम्बा बावुमाने म्हटले. दक्षिण आफ्रिकेने भारताच्या तीन दौऱ्यांमध्ये सलग सात कसोटी सामने गमावले आहेत. त्यांनी २०१० साली नागपूर येथे शेवटचा विजय मिळवला होता.
बावुमा म्हणाला, ‘जागतिक कसोटी अजिंक्यपद पटकावणे निश्चितच महत्त्वाचे आहे; पण भारतात कसोटी विजय, त्यानंतरच्या क्रमांकावर येईल. आम्ही खूप काळापासून हे साध्य करू शकलो नाही. त्यामुळे महत्त्वाकांक्षेच्या दृष्टीने हा विजय आमच्यासाठी सर्वोच्च आहे. आम्ही या आव्हानाचे गांभीर्य ओळखतो आणि त्याची किंमत जाणतो. दोन्ही संघांची ताकद पाहता, ही मालिका अत्यंत रोमांचक ठरेल.’
विलियम्सनने दिला सल्ला!
न्यूझीलंडने भारतात ३-० असा कसोटी मालिका विजयाचा पराक्रम केला होता. बावुमाने मुंबईतील एका पुरस्कार सोहळ्यात केन विलियम्सनकडून टिप्स मागितल्या. बावुमाने ही आठवण सांगताना म्हटले की, ‘विलियम्सनने विनोदी ढंगात उत्तर दिले. त्याने म्हटले की, केवळ नाणेफेक जिंकण्याची खात्री कर. त्याने फार काही गुपित सांगितले नाही; पण त्याचे उत्तर अर्थपूर्ण होते. भारतातील विजयासाठी सुरुवातच योग्य करायला हवी!’