Join us
Daily Top 2Weekly Top 5

India vs South Africa, 3rd Test : पंधरा वर्षांच्या क्रिकेट कारकिर्दीनंतर 'या' खेळाडूचं टीम इंडियात पदार्पण

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका तिसऱ्या कसोटीच्या पुर्वसंध्येपर्यंत शाहबाज नदीम हे नाव चर्चेतही नव्हते.

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2019 10:17 IST

Open in App

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका तिसऱ्या कसोटीच्या पुर्वसंध्येपर्यंत शाहबाज नदीम हे नाव चर्चेतही नव्हते. विजय हजारे चषक स्पर्धेतील सामना खेळून तो नुकताच कर्नाटकातून रांचीत परतला होता. पण, शुक्रवारी रात्री बातमी आली आणि शाहबाजची तिसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियात निवड झाली. कुलदीप यादवच्या खांद्याला झालेल्या दुखापतीमुळे शाहबाजला संघात स्थान मिळाले. पण, सामना सुरु होईपर्यंत त्याला अंतिम अकरामध्ये स्थान मिळेल की नाही, याचीही खात्री नव्हती. कर्णधार विराट कोहलीनं सामना सुरू होण्यापूर्वी शाहबाजला कसोटी पदार्पणाची कॅप दिली. भारताकडून कसोटीत पदार्पण करणारा तो 296 वा खेळाडू ठरला. विशेष म्हणजे 15 वर्षांच्या क्रिकेट कारकिर्दीनंतर त्याला पहिलाच आंतरराष्ट्रीय कसोटी सामना खेळण्याची संधी मिळाली.  2004मध्ये झारखंड संघाकडून शाहबाजनं प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीही त्यावेळी झारखंड संघाकडून खेळायचा. पण, 15 वर्षांनंतर शाहबाजला टीम इंडियाकडून पदार्पणाची संधी मिळाली. त्यानं भारत A संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. त्यानं प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 110 सामन्यांत 28.59च्या सरासरीनं 424 विकेट्स घेतल्या आहेत. रणजीच्या 2015 ते 2017 पर्यंतच्या सत्रात त्यानं 107 विकेट्स घेत टीम इंडियाचे दार ठोठावले होते. पण, त्याला संधी मिळाली नाही.

इंडियन प्रीमिअर लीगमध्ये त्यानं दिल्ली डेअरडेव्हिल्स आणि सनरायझर्स हैदराबाद संघाचे प्रतिनिधित्व करताना 64 सामन्यांत 42 विकेट्स घेतल्या आहेत. 2018च्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या वन डे व ट्वेंटी-20 मालिकेत भारतीय संघात त्याचा समावेश करण्यात आला होता, परंतु त्याला खेळण्याची संधी मिळाली नाही.

 

टॅग्स :भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकाझारखंड