भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा कसोटी सामना गुरुवारपासून पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर खेळवण्यात येणार आहे. भारताने पहिल्या कसोटीत आफ्रिकेवर 203 धावांनी विजय मिळवून तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. रोहित शर्मानं कसोटीत प्रथम सलामीला येताना दोन्ही डावात शतकी खेळी करून इतिहास घडवला. त्याच्या या खेळीला मयांक अग्रवाल, आर अश्विन, रवींद्र जडेजा आणि मोहम्मद शमी यांची उत्तम साथ लाभली. मालिकेतील दुसरा सामना ज्या पुण्यात खेळवला जाणार आहे, त्या स्टेडियमवरील टीम इंडियाची कामगिरी चिंता वाढवणारी आहे.
दोन वर्षांपूर्वी येथे झालेल्या कसोटीत टीम इंडियानं सपशेल शरणागती पत्करली होती आणि तीन दिवसांतच सामन्याचा निकाल लागला होता. विशेष म्हणजे या सामन्यात जवळपास 30 विकेट्स या फिरकीपटूंनीच पटकावली होती. अनपेक्षित उसळीमुळे फलंदाजांनाही येथे खेळणे अवघड गेले होते. टीम इंडियाच्या त्या हाराकिरीनंतर स्टेडियमच्या खेळपट्टीचे क्युरेटर पांडुरंग साळगावकर हेही चर्चेत आले होते. त्यामुळे उद्याच्या कसोटीत खेळपट्टी नेमकी कोणाला साथ देईल, याची उत्सुकता लागलेली आहे. पण, 2017मध्ये नेमकं असं काय घडलं होतं?
441 धावांच्या विजयाचे लक्ष्य डोळ्यासमोर ठेवून मैदानावर उतरलेला भारताचा संघ 107 धावांत तंबूत परतला. ओ'किफ ( 6/35) आणि नॅथन लियॉन ( 4//53) यांच्या फिरकीसमोर टीम इंडियाचे फलंदाज अपयशी ठरले. कसोटी इतिहासातील भारताचा हा लाजीरवाणा पराभव ठरला.