पुणे : हवामान विभागाने मुसळधार पावसाचा इशारा दिला असताना सलग दोन दिवस पुणे आणि परिसरात पावसाने दखलपात्र हजेरी लावली. यामुळे भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या (एमसीए) आंतरराष्ट्रीय र्स्टेिडयमवर गुरुवारपासून सुरू होणाऱ्या कसोटी सामन्यावर पावसाचे सावट आहे.
जागतिक अजिंक्यपद कसोटी मालिकेअंतर्गत यजमान भारत आणि आफ्रिका यांच्यात ३ कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. पहिला सामना २०३ धावांनी जिंकून भारताने १-०ने आघाडी घेतली. दुसरा सामनाही जिंकून मालिकेत विजयी आघाडी घेण्याच्या निर्धाराने कोहली अॅण्ड कंपनी मैदानावर उतरतील. दुसरीकडे, भारतीय संघाला नमवून मालिकेतील आव्हान जिवंत राखण्याच्या निर्धाराने पाहुणा संघ सर्वस्व पणाला लावणार आहे.
मंगळवारी आणि बुधवारी पुणे परिसरात मुसळधार पाऊस झाला. पुढील दोन दिवसही गडगडाटासह पावसाची शक्यता आहे. दोन्ही दिवस सायंकाळी आणि रात्री पाऊस झाला. पुढील २ दिवस पाऊस झालाच तर सायंकाळी आणि रात्रीच व्हावा, अशी क्रिकेटप्रेमींची इच्छा आहे. पाऊस झाला तरी, सामना लवकर सुरू करण्यासाठी आवश्यक यंत्रणा सज्ज आहे, असे आयोजकांनी सांगितले.
यांच्यावर असेल लक्ष...
रोहित शर्मा : विशाखापट्टणम कसोटीच्या दोन्ही डावांत शतके झळकावत रोहितने प्रतिस्पर्ध्यांना धोक्याचा इशारा दिला आहे. पुण्याच्या मैदानावर त्याच्या बॅटला वेसण घालण्याचे मुख्य आव्हान आफ्रिकेच्या गोलंदाजांसमोर असेल.
मयंक अगरवाल : सलामीच्या जोडीची चिंता भारताला सतावत असताना मयांकने पहिल्या कसोटीत शानदार द्विशतक झळकावत आपल्या क्षमतेचा परिचय दिला आहे. या कसोटीतही त्याच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा असेल.
मोहम्मद शमी : नव्या तसेच जुन्या चेंडूवर प्रतिस्पर्ध्यांना अडचणीत आणणारा स्विंग गोलंदाज, अशी ओळख शमीने क्रिकेटविश्वात निर्माण केली आहे. पहिल्या कसोटीच्या दुसºया डावात शमीने ज्या पद्धतीने ५ बळी घेतले, ते पाहता पाहुणे त्याला वचकून खेळतील.
रविचंद्रन अश्विन : एकेकाळी भारतीय संघाचा आधारस्तंभ असलेला हा फिरकीपटू काही काळ संघाबाहेर होता. मात्र, संधी मिळाल्यावर अश्विनने स्वत:ला सिद्ध केले. पण, तो एवढ्यावरच समाधान मानणारा नाही. पहिल्या सामन्यात ८ बळी घेत आश्विनने आपले इरादे जाहीर केले आहेत.
पावसाबरोबरच खेळपट्टीबाबतही उत्सुकता
पाटा खेळपट्टी अशी ओळख असलेल्या या खेळपट्टीने २०१७च्या कसोटीत आपला स्वभाव पूर्णत: बदलला होता. यामुळे, पावसासह खेळपट्टीचीही उत्सुकता आहे. आॅस्ट्रेलियाविरुद्ध तिसºया दिवशीच भारताचा ३३३ धावांनी धुव्वा उडल्यावर या खेळपट्टीवर मोठी टीका झाली होती. २ वर्षांपूर्वीच्या घटनेची पुनरावृत्ती येथे होऊ नये, अशी प्रार्थना क्रिकेटप्रेमी करीत आहेत.