KL Rahul Century: भारतीय संघाचा सलामीवीर लोकेश राहुल याने आफ्रिकेविरूद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्याच दिवशी दमदार शतक ठोकलं. मयंक अग्रवालच्या साथीने लोकेश राहुलने डाव सुरू केला होता. मयंक अर्धशतकानंतर (६०) बाद झाला. पुढच्याच चेंडूवर अनुभवी चेतेश्वर पुजाराही शून्यावर बाद झाला. पण कर्णधार विराट कोहलीने राहुलला चांगली साथ दिली. त्यामुळे लोकेश राहुलने २१८ चेंडूत आपलं सातवं कसोटी शतक झळकावलं. कसोटी संघाचे उपकर्णधारपद मिळाल्यानंतर त्याचं हे पहिलं शतक ठरलं. तसंच भारताबाहेरचं हे त्याचं सहावं शतक आहे.
नाणेफेक जिंकल्यावर कर्णधार विराट कोहलीने फलंदाजी निवडली. सलामीवीर राहुल आणि मयंक दोघांनी त्याचा निर्णय सार्थ ठरवला. मयंक अग्रवालने वेगाने धावा जमवण्यास सुरूवात केली तेव्हा राहुलने संयमी खेळी केली. मयंक-राहुल जोडीने पहिले सत्र पूर्ण खेळून काढले. दुसऱ्या सत्रात मंयकने अर्धशतक केले आणि ६० धावा काढून तो बाद झाला. पुजाराही लगेचच बाद झाला. दोघांना दोन चेंडूत लुंगी एन्गीडीने माघारी धाडले.
कर्णधार विराटने राहुलला चांगली साथ केली. विराटच्या साथीने डाव पुढे नेत असताना राहुलने आधी अर्धशतक साजरं केलं. त्यानंतर झटपट धावा करत त्याने शतकाला गवसणी घातली. केशव महाराजच्या फिरकीला लक्ष्य करत त्याने दमदार फटकेबाजी केली.
राहुलला सामन्याच्या सुरूवातीला एकदा नाबाद ठरवण्यात आलं होतं. त्यावेळी आफ्रिकेने DRS ची मागणी केली होती. पण त्याचा काही उपयोग झाला नाही. राहुलने अर्धशतकानंतर एकदा हवेतदेखील फटका मारला होता. पण आफ्रिकन फिल्डरला झेल घेता आला नाही. राहुलला मिळालेल्या जीवदानाचा त्याने योग्य वापर केला आणि आपली खेळी सजवत २१८ चेंडूत शतक साजरं केलं.