India vs Pakistan Live Update Marathi : रोहित शर्मा आणि शुबमन गिल यांच्या दमदार फटकेबाजीमुळे पाकिस्तानला हतबल केले होते. आजच्या सामन्यावर पावसाचे संकट असणार असा अंदाज व्यक्त केला गेला होता, परंतु भारतीय फलंदाजांचे संकट पाकिस्तानवर घोंगावताना दिसले. रोहित व शुबमन यांनी १२१ धावांची भागीदारी केली अन् पाकिस्तानला ओपनर्सला माघारी पाठवण्यात यश आले. आता सामन्यावर पकड घेण्यासाठी उत्सुक असलेल्या पाकिस्तानच्या मार्गात पावसाचा अडथळा आला अन् वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस सुरू झाल्याने सामना थांबला. अजूनही कोलंबोत जोरदार पाऊस सुरू आहे आणि हे लक्षात घेऊन ११ सप्टेंबर हा राखीव दिवस ठेवला गेला आहे. भारताची पुन्हा बॅटींग न झाल्यास पाकिस्तानसमोर DLS नुसार काय असेल लक्ष्य?

बाबर आजमने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आणि तिथेच तो फसला. रोहित आणि शुबमन या जोडीने १३. २ षटकांत फलकावर शतक झळकावले. रोहितने शादाबच्या फुलटॉसवर षटकार खेचून ४२ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. पण, तरीही बाबरने त्याला गोलंदाजी दिली अन् शादाबच्या गोलंदाजीवर मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात रोहित ५६ धावांवर ( ४९ चेंडू, ६ चौकार व ४ षटकार) झेलबाद झाला. विराट कोहली मैदानावर येताच बाबरने शाहीनला पुन्हा गोलंदाजीला आणले, परंतु त्याने शुबमनला बाद केले. शुबमन ५२ चेंडूंत १० चौकारांच्या मदतीने ५८ धावांवर बाद झाला.

दोन्ही सेट फलंदाज माघारी परतल्यानंतर भारताचा डाव थोडासा मंदावला. विराट कोहली व लोकेश राहुल यांनी संयमी खेळावर भर दिला. २४.१ षटकानंतर पावसाला सुरुवात झाली आणि मैदानावर कव्हर्स टाकण्यात आले. भारताच्या २ बाद १४७ धावा झाल्या आहेत. जर भारताने पुन्हा फलंदाजी न केल्यास पाकिस्तानसमोर २४ षटकांत २०६ धावांचे असेल लक्ष्य. डकवर्थ लुईस नियमानुसार पाकिस्तानसमोर तगडे आव्हान असेल.
24 overs: 203
23 overs: 198
22 overs: 192
21 overs: 185
20 overs: 179